औरंगाबाद : मालमत्तेच्या वादातून शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये बुधवारी रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या वेळी चाकूने भोसकण्यात आल्याने एक जण जागीच ठार झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी गुरुवारी सांगितले. रिझवान खान रशीद खान (वय ३२, रा.उस्मानपुरा) असे हाणामारीत ठार झालेल्या तरुणाचे नाव असून तो सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. मेहराज खान रशीद खान, आवेज खान दोस्त मोहम्मद खान व आदिल खान नसीर खान, अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान, रिझवान खान यांच्या मारेकऱ्यास अटक करा, त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाहीत, असा पवित्रा त्यांच्या नातेवाइकांनी घेतल्याने घाटी रुग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

शेंद्रा एमआयडीसीत नूर इंटरप्रायजेस ही कंपनी असून ती सध्या अब्दुल गणी कुरैशी यांच्या ताब्यात आहे. त्या कंपनीच्या मालकी हक्कावरून गेल्या काही दिवसांपासून खली अबु तुराब व अब्दुल गणी कुरैशी यांच्यात वाद सुरू होता. या कंपनीत रिझवान खान रशीद खान हा गेल्या दहा वर्षांपासून सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. बुधवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी रिझवान खान हा कंपनीत गेला होता. त्या वेळी रात्री कंपनीत कारमधून पाच ते सहा जण उतरले आणि वाद घालू लागले. प्रवेशद्वारावर असलेल्या रिझवान खान याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याला बाजूला करून त्यांनी कंपनीत धुडगूस घालण्यास सुरूवात केली. या वेळी त्यांना रिझवान खान व त्याचा भाऊ मेहराज खान यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. खालीद अबू तुराब, शेख अब्दुल माजीद शेख अब्दुल हमीद, आवेज खान दोस्त मोहम्मद खान, आदिल खान नासीर खान, कैसर कुरैशी यांनी दोन्ही भावंडांवर चाकूने सपासप वार केले. यामध्ये रिझवान खान व त्याचा भाऊ मेहराज खान हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले.

या घटनेची माहिती आजूबाजूच्या कंपनीतील सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना दिल्यावर चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी दोन्ही गटात वाद सुरू होता, पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना शांत करून जखमींना उपचारासाठी घाटीत दाखल केले.

रिझवान खान याला दाखल करताच डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिकलठाणा पोलिसांनी रात्रीच दोन आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनी दिली.