News Flash

घाटीचे ‘स्ट्रेचर’ अडकते मनुष्यबळात

चतुर्थ श्रेणीची २२६ पदे रिक्त, औषधांसाठी रुग्णांना बाहेरची वाट

चतुर्थ श्रेणीची २२६ पदे रिक्त, औषधांसाठी रुग्णांना बाहेरची वाट

शासनाच्या घाटी रुग्णालयात अत्यवस्थ रुग्ण घेऊन गेले की रुग्णांच्या नातेवाइकांना पहिले काम लागते ते स्ट्रेचर ढकलण्याचे. कारण स्ट्रेचर नेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडे आवश्यक ते मनुष्यबळच नाही. रुग्णांच्या मायेपोटी बरोबर आलेले नातेवाईक ते कामही करतात. मग त्याच्या हातात बाहेरून औषधे आणण्याची चिठ्ठी दिली जाते. कसेबसे दादापुता करून रुग्णांवर उपचार करून घ्यायचे कारण घाटी रुग्णालयात मोठय़ा प्रमाणात रिक्त पदे आहेत.

घाटी रुग्णालयासाठी वर्ग-४ ची ७४४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २२६ पदे रिक्त आहेत. अतिदक्षतेची गरज असणारे रुग्ण या रुग्णालयात येणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेच्या प्राथमिक उपचार केंद्रात नीट उपचार मिळत नसल्याने अगदी किरकोळ आजार असेल, तरीही रुग्ण घाटी रुग्णालयच गाठतात. त्याच बरोबर मराठवाडय़ासह बुलढाणा व नगर जिल्हय़ातील रुग्णही येथे उपचारासाठी येत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांवर ताण येतो. बाहय़रुग्ण विभागात सरासरी दोन हजार रुग्ण येतात. आंतर रुग्ण विभागात १५० रुग्ण असतात. दररोज सरासरी ९० महिलांची प्रसूती होते. छोटय़ा-मोठय़ा १०० शस्त्रक्रिया होतात. सोनोग्राफी, एमआरआय, रक्ताच्या वेगवेगळय़ा तपासण्या ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असते.

विविध विभागात काम करण्यासाठी आवश्यक तो चतुर्थश्रेणी कर्मचारी नसल्याने सारे काही अडून बसते. त्यातही काहींना मद्यपानाची सवय आहे. मंगळवारी रात्री एकाने तर बराच गोंधळही घातला. केवळ चतुर्थ श्रेणींची कमतरता आहे असे नाही तर परिचारिकांची संख्याही कमी आहे. परिणामी यंत्रणेवर मोठा ताण येतो. रुग्णांचेही हाल होतात. अगदी स्ट्रेचर ओढण्यासाठी व्यक्ती नसतो. नुकतेच सिल्लोड तालुक्यात गिरिजा नदीच्या पुलावरील तुटलेल्या कठडय़ामुळे टेम्पो पडून झालेल्या अपघातात २२ जण जखमी झाले होते. त्या दिवशी स्ट्रेचर ओढायला कार्यकर्ते आणि नातेवाईक होते म्हणून कसेबसे काम भागले.

पण कमी मनुष्यबळामुळे आणि निधीच्या तरतुदीमुळे वैद्यकीय सेवेवरील ताण वाढतच आहेत. वैद्यकीय शासकीय महाविद्यायातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पद भरतीसाठी अनेक वेळा पाठपुरावाही केला आहे. मात्र, धोरणात्मक निर्णय रेंगाळत ठेवले जात असल्याचेच चित्र आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 2:06 am

Web Title: class iv 226 posts vacant in hospital administration
Next Stories
1 सहा बेकायदा कत्तलखान्यांवर उस्मानाबादमध्ये कारवाई
2 मानव विकासमधून शेतकऱ्यांना विपणन प्रशिक्षण
3 विमा हप्ता भरूनही ३० हजार शेतकरी वंचित