शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून घागरभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. टँकरच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा १५ ते २० दिवसांनी होत आहे. शहरवासीयांना उपलब्ध होणारे पाणी शुद्ध असेलच याची शाश्वती नसल्याने साथरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही वाढली आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपच्या शहर जिल्हा शाखेच्या वतीने अवघ्या १५ रुपयात २० लिटर शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
भाजपचे सुनील मलवाड व प्रवीण येळे यांच्या पुढाकारातून सुरू केलेल्या या पाणी वितरणाचे उद्घाटन खासदार डॉ. सुनील गायकवाड, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. लातूरकरांचे आरोग्य अबाधित राहावे, या हेतूने भाजप शहर जिल्हा शाखेच्या वतीने ना नफा ना तोटा या तत्त्वावर हा उपक्रम हाती घेण्यात आला. याचा लातूरकरांनी फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.