06 March 2021

News Flash

एक पाऊल स्वच्छतेचे, पुढे जाणारे!

औरंगाबाद शहरात दररोज सरासरी साडेचारशे टन कचरा तयार होतो.

सुरेश घोरपडे स्वच्छतेसाठी जनजागृती करताना

सफाई कार्यकर्ते बनले मार्गदर्शक

कचऱ्यातले आयुष्य त्यांचे. असे कितीसे उंचीवर जाईल?- औरंगाबादच्या सुरेश बन्सी घोरपडे आणि किरण बोरुडे यांना विचाराल तर नवेच आयाम कळतील. कारण किरण बोरुडे राष्ट्रीय हरित परिषदेच्या कौशल्य विकास विभागात कचरा व्यवस्थापनातील प्रशिक्षण देणाऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम पाहू लागले आहेत. देशातील अशा प्रकारच्या काम करणाऱ्या त्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. सुरेश घोरपडे सिडकोमध्ये स्वच्छता निरीक्षक होते. पण कचरा वर्गीकरणाची जनजागरणाची मोहीम स्वयंसेवी संस्थेमार्फत हाती घेतली आणि आता त्यांच्यासारख्यांच्या कामामुळे शहरातील ९३ वॉर्डात ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो. गेल्या वर्षभरात ९९३ मेट्रिक टन कचरा वाहतूक आता कचरा डेपोपर्यंत करावी लागत नाही. तब्बल ७४० कचराकुंडय़ा कमी झाल्याचा दावा केला जात आहे.

औरंगाबाद शहरात दररोज सरासरी साडेचारशे टन कचरा तयार होतो. तो सर्व कचरा शहराजवळील नारेगाव येथे साठवला जातो. हे कचरा साठवणुकीचे केंद्र आता मोठा कचऱ्याचा डोंगर बनला आहे. त्यात रोजच वाढ होत असते. त्यामुळे कचरा कमी करायचा असेल तर त्याचे वर्गीकरण केले जावे. ओला आणि सुका कचरा वेगळा केला की, त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक कचऱ्यावर प्रक्रिया करता येणे सहज शक्य आहे, असे ‘माझी सिटी टकाटक’ या अभियानातील कार्यकर्त्यांना वाटत होते. त्यातूनच उभ्या राहिलेल्या प्रकल्पात काही खासगी कंपन्यांनी मदत दिली आणि आता कचरा वेचणाऱ्यांची, त्याची वाहतूक करणाऱ्यांचे आयुष्य बदलू लागले आहे. महापालिकेच्या १८३८ कर्मचाऱ्यांसह काही कार्यकर्त्यांना सरासरी आठ वेळा प्रशिक्षण दिल्यानंतर कचरा व्यवस्थापनातील समस्या-समाधान पुढे येऊ लागले आहे. झोन-६ मधील रवींद्र भालेराव यांची प्रतिक्रिया मोठी बोलकी आहे. ते सांगतात, पूर्वी कचरा उचलण्यासाठी गाडी येत नव्हती, अशा दिवसाला १५ तक्रारी असायच्या. आता त्या एक किंवा दोनवर आल्या आहेत. हे सगळे करण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता निरीक्षक, जवान, कचरावेचक यांची प्रशिक्षणे घेतली.

किरण बोरुडे या महिला तसे झाडलोट करण्याचे काम करायच्या. तशा साध्याशा वाटणाऱ्या किरण बोरुडेंना प्रशिक्षण मिळाले आणि त्या आता कचरा व्यवस्थापन क्षेत्रातल्या मार्गदर्शक बनल्या आहेत. काही हजार लोकांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे आणि अलिकडेच रत्नागिरी शहरातील कचरा व्यवस्थापन कसे असावे, यासाठी त्यांनी तेथील सफाई कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले. या सगळ्या प्रक्रियेत कचरा जेथे निर्माण होतो, त्या प्रत्येक घरातील महिलेला कचरा वेगळा केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात, हे समजावून सांगण्याचे तंत्र संस्थेने विकसित केले. काही लाख लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवताना कार्यकर्त्यांनी खूप छोटे पण प्रभावी उपक्रम हाती घेतले. घरातून कचरा उचलायचा आणि तो कुंडीत न टाकता सरळ कचरागाडीत टाकायचा, अशी सवय लागल्यानंतर शहरातील ७४० कचऱ्याची ठिकाणे नाहीशी झाली. त्या जागेवर कार्यकर्त्यांनी मग रांगोळी घातली. स्वच्छता आपोआपच दिसू लागल्याने नागरिकही या मंडळीला सहकार्य करू लागली. ‘सिव्हिक रिसपॉन्स टीम’ या नावाने कार्यरत सर्वाना प्रशिक्षण देत हाती घेण्यात आलेल्या उपक्रमाला आता मान्यता मिळू लागली आहे. हाच प्रयोग वैजापूर नगरपालिकेतही सुरू करण्यात आला आहे.  अन्य शहरांमधील कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी सुरू असणाऱ्या प्रयत्नांना किरण बोरुडे आणि सुरेश घोरपडेंसारख्या कार्यकर्त्यांनी मोठा हातभार लावला आहे. त्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री खासगी कंपन्यांनी दिलेल्या सामाजिक दायित्व निधीतून उभारण्यात आली. हातमोजे, पायात बूट, नाकाला बांधायला खास पद्धतीचे रुमाल खरेदी करण्यात आले. अगदी कचरावेचकांनाही यातील बरेच साहित्य दिले गेले. हा प्रयोग संपूर्ण शहरात अजून सुरू झालेला नाही, तरीही कचऱ्याचा डोंगर कमी करण्याचा भाग म्हणून त्याला यश मिळत आहे. त्याची दखल घेत काही प्रशिक्षक आता राज्यस्तरावरही काम करू लागले आहेत. किरण बोरुडे आणि सुरेश घोरपडे ही त्यातील महत्त्वाची नावे. अनेक वॉर्डामध्ये हे सफाईचे काम अधिक तंत्रसुलभ व्हावे म्हणून वाहतुकीचे मार्ग जीपीएसने जोडण्यात आले आणि वाहतुकीवरचा खर्चही कमी झाला. या अनुषंगाने बोलताना सिव्हिक रिसपॉन्स टीमच्या गौरी मिराशी म्हणाल्या, कचरा ही समस्या असली तरी त्यावर समाधान शोधण्यासाठी आशययुक्त प्रशिक्षणांची आवश्यकता होती. त्याची आखणी चांगली झाली आणि यापुढे ती कशी असावी याचे प्रशिक्षण साहित्यही विकसित केले जात आहे. गौरी मिराशी आणि नताशा झरीन या दोघींच्या समन्वयाने बोरुडे आणि घोरपडेंसारखे कार्यकर्ते औरंगाबादमध्ये निर्माण झाले आहेत आणि त्यांच्या कामाचा बोलबाला आता रत्नागिरीतही होतो आहे. देशाच्या हरित परिषदेच्या कौशल्य विकास कार्यक्रमातही किरण बोरुडे यांची नुकतीच निवड झाली आहे.

 

कचरा वेचकांचे सर्वसाधारण वय ४३ वर्ष असून त्यांच्या कुटुंबातील ४५ टक्के रक्कम ही कचरा उचलण्याच्या कामातून मिळते. सरासरी ४०० रुपयांपर्यंत कचरा वेगळा करणाऱ्यांना आता पैसे मिळत आहेत. ८११ टन कचरा डेपोमध्ये न जाता त्याच्यावर प्रक्रिया करण्यात या संस्थेला यश मिळाले आहे. या कामाची वार्षिक किंमत काढली तर ती ३४ लाख ४७ हजार एवढी होते. हा महापालिकेचा फायदा असल्याचा दावा सिव्हिक रिसपॉन्स टीमच्या नताशा झरीन करतात.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2018 3:38 am

Web Title: cleaning worker kiran borude giving training on waste management
Next Stories
1 औरंगाबादेतील ३५ हजार मालमत्ताधारक कर बुडवतात
2 पर्यावरण खात्यामुळे हजारो कामगारांचे भवितव्य टांगणीला!
3 ‘योग्य वेळ आल्यावर हातोडा मारीन’!
Just Now!
X