संगीत, संस्कृत विषयातील तज्ज्ञांकडून तीव्र नाराजी

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील काही अभ्यासक्रम हे बंद करण्याच्या पार्श्वभूमीवर एका बैठकीत मंथन झाल्याची माहिती आहे. या अभ्यासक्रमांना विद्यार्थी मिळत नसून त्यांचा आर्थिक भारही विद्यापीठावर पडत आहे. विद्यापीठाच्या मंथन बैठकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून विद्यार्थी मिळत नसतील तर ते विद्यापीठाचे अपयश असल्याच्या प्रतिक्रिया संगीत, संस्कृत अभ्यासक, तज्ज्ञांकडून उमटत आहेत.

संगीत, संस्कृत, जर्मन भाषा, नॅनो टेक्नॉलॉजी, संगणकशास्त्र, मुद्रणशास्त्र, आदी विनाअनुदानित अभ्यासक्रम बंद करण्याबाबत मंथन सुरू आहे. यासंदर्भात नॅक मूल्यांकन समितीनेही उपरोक्त विद्यार्थी मिळत नसणारे अभ्यासक्रम बंद करण्याची सूचना केल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीतही चर्चा झाल्याचे समजते.

यासंदर्भात काही मान्यवरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यापीठातील संगीत विभाग बंद करण्याचा विचार होत असेल तर त्यासारखी दुसरी दुर्दैवी बाब नाही. संगीत अकादमीचा पुरस्कार मिळवणारे मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक पंडित नाथराव नेरळकर यांनी विद्यापीठात संगीत विभाग सुरू करण्यासाठी अनेक वर्षे पाठपुरावा केला. सुमारे ५० वर्षानंतर विद्यापीठात संगीत विभाग सुरू झाला. आजही संगीत विभाग हा विनाअनुदानित आहे. या विभागाकडून अलीकडेच आकारास आलेला ‘गीत भीमायन’ हा प्रकल्प लोकप्रिय होत असून त्यापोटी विद्यापीठाला १० कॉपीराईट मिळालेल्या असल्याचेही संगीत विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. संगीत विभागाचा अतिरिक्त पदभार सांभाळणारे प्रा. शेवतेकर यांनी अभ्यासक्रम बंद करण्याच्यासंदर्भात आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

संस्कृत ही संस्कृतीची भाषा असून त्यासंदर्भातील अभ्यासक्रम बंद करण्याचा विचार होणे हे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया काही अभ्यासकांनी दिली आहे. यासंदर्भात संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. क्रांती व्यवहारे यांना विचारले असता, याबाबत आपल्याला कुठलीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, संस्कृतला पुरेशी विद्यार्थी संख्या आहे. २० विद्यार्थी भाषेचे शिक्षण घेणारे, तर १८ हे ‘आचार्य’ पदवीसाठीचे विद्यार्थी आहेत. संस्कृत विभाग हा विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नव्हे तर आपल्या विद्यापीठाच्या निधीतून चालवला जातो. इमारतीसाठी अडीच कोटींचा निधीही मिळालेला आहे, असे डॉ. व्यवहारे यांनी सांगितले.

अद्याप कोणताही निर्णय नाही

नॅक समितीने काही अभ्यासक्रमांबाबत विद्यापीठाला काही सूचना केलेल्या आहेत. त्यावर विचार करण्याच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या दोन दिवसीय बैठकीत केवळ चर्चा झालेली आहे. शेवटी नॅकने सुचवलेल्या काही बाबींचाही विचार करावा लागेल. मात्र, अद्याप काही अभ्यासक्रम बंद करण्याबाबतच्या निर्णयापर्यंत विद्यापीठाने विचार केलेला नाही.  – डॉ. श्याम शिरसाठ, प्र-कुलगुरू, विद्यापीठ.

काही अभ्यासक्रम बंद करण्याची सूचना मिळत असेल तर ते विद्यापीठाचे अपयश आहे. विद्यापीठाने एखाद्या अभ्यासक्रमाला विद्यार्थी मिळत नसतील तर त्याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. संस्कृत, संगीत विषय हे जतन केलेच पाहिजेत. – पंडित शिवदास देगलुरकर, माजी सदस्य, विद्यापीठ मंडळ.

संगीत हा विषय संस्कारांचा एक भाग आहे. संस्कारांना पैशांच्या तराजूत तोलता कामा नये. याच विभागाचा प्रकल्प असलेल्या ‘गीत भीमायन’चे नॅक समितीपुढेही सादरीकरण करण्यात आलेले आहे. संगीत विभाग बंद होणार नाही, हा विश्वास वाटतो. –  प्रा. संजय मोहोड, प्रकल्प समन्वयक, गीत भीमायन.