सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापनेसाठी शिवसेना-भाजपाने एकमेकांच्या पायात पाय घालण्याची कार्यपद्धती कायम ठेवली असताना शुक्रवारी कामकाज मात्र जोमात सुरू होते. सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडय़ातील पिकांच्या नुकसानीचा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा घेतला. त्यापाठोपाठ पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनीही पीक नुकसानीचा आढावा आणि वॉटरग्रिड योजनेतील बदलांच्या प्रक्रियेविषयीची बैठक घेतली. एका बाजूला ही प्रक्रिया सुरू असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाडय़ात ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे यांनी जाहीर केले. तर वसमत तालुक्यातील पीक पाहणीसाठी शरद पवार येणार आहेत.

पावसामुळे ३० लाख हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याची माहिती विभागीय प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानंतर पाणीपुरवठामंत्र्यांनीही याच अनुषंगाने बैठक घेतली. त्यामुळे सरकार आज जोमात कामाला लागले आहे, असा संदेश प्रशासकीय यंत्रणेपर्यंत गेला.

ही लगबग सुरू असतानाच उद्धव ठाकरे मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर येणार आहेत. कानडगाव आणि वैजापूर तालुक्यातील गारज येथे ते पिकांच्या नुकसानीची पाहणी करून विभागीय आयुक्त कार्यालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावाही घेणार आहेत. वसमत तालुक्यातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांच्या मतदारसंघात शरद पवार दौरा करणार आहेत.