दोषींवर गुन्हे दाखल करणार

औरंगाबाद : ‘लाथ मारली तरी सिमेंट बंधारे पडतात. एवढे निकृष्ट काम कसे करता? यापुढे असे काम सहन केले जाणार नाही. ज्या कंत्राटदारांनी अशी कामे केली असतील, त्यांच्याकडून ती तातडीने दुरुस्त करून घ्या. नाहीतर सर्वावर गुन्हे दाखल होतील,’ या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद जिल्ह्य़ातील लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) आणि जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागातील अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. ‘तुमच्यामुळे चांगली योजना बदनाम होत आहे. याकडे लक्ष द्या’, असेही त्यांनी बजावले. दुष्काळी भागात गाळमुक्त धरणाची कामे दुपटीने प्रस्तावित करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. औरंगाबाद येथे दुष्काळ आणि विविध योजनांच्या आढाव्यासाठी ते आले होते. ऑक्टोबरअखेपर्यंत दुष्काळ जाहीर करण्याच्या अनुषंगाने एक टप्पा पूर्ण होईल. त्यानंतर केंद्रीय पथक राज्यात येईल आणि मग दुष्काळ जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले.

योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार औरंगाबादची बैठक आज घेण्यात आली. दुष्काळ आणि टंचाईची स्थिती लक्षात घेता तालुकानिहाय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबर त्यांनी संवाद साधला. जिल्ह्य़ातील सिमेंट नालाबांधाच्या कामावरून होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनीही जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभाग आणि स्थानिक स्तर विभागाकडून केल्या जाणाऱ्या सिमेंट नालाबांधाच्या तक्रारी अधिक येत असल्याचे मुख्यमंत्र्यांसमोर सांगितले.

पंतप्रधान आवास योजना, जलयुक्त शिवार योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातील योजना, मुद्रा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा आढावा त्यांनी घेतला. शेततळ्याच्या बाबतीत औरंगाबाद जिल्ह्य़ाने केलेल्या कामाची प्रगती त्यांच्यासमोर ठेवण्यात आली. शेततळ्यांमुळे जिल्ह्य़ातील फळबागा टिकल्या असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. जलयुक्तमध्ये केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी केली जाईल आणि दोषींवर गुन्हेही दाखल केले जातील, असेही त्यांनी नंतर पत्रकार बैठकीत सांगितले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ७०० किलोमीटरची कामे हाती घेण्याचे ठरविण्यात आले होते. त्यातील १४० किलोमीटरचे रस्ते पूर्ण झाले आहेत. अन्य काही कामांच्या निविदा नोव्हेंबपर्यंत काढण्यात येतील आणि जून २०१९ पर्यंत ही कामे पूर्ण केली जातील, असेही त्यांनी सांगितले. मात्र, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत काही निवडक ठेकेदार निविदा भरत आहेत आणि काम मात्र करत नाहीत, अशी तक्रार यावेळी करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री दीपक सावंत, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब,आदींची यावेळी उपस्थिती होती.

पाच हजारांहून अधिक बंधारे

सिमेंट नालाबांधाच्या निकृष्ट कामावरून मुख्यमंत्र्यांनीच अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्यानंतर मराठवाडय़ात किती सिमेंट नालाबांध बांधण्यात आले, याची माहिती सूत्राकडून घेतली असता २०१५-१६ पासून ५४२९ सिमेंट बंधारे बांधण्यात आले. त्यातील २८४८ सिमेंट बंधारे २०१५-१६ मध्ये, २०१६-१७ मध्ये २५०३, तर २०१७-१८ मध्ये १३० बंधारे बांधण्यात आले. एका बंधाऱ्याची किंमत साधारणत: १० लाख रुपयांपासून ते २२ लाख रुपयांपर्यंत असू शकते. पाणी साठवण्याच्या क्षमतेनुसार ही रक्कम बदलते.