पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर पन्नास दिवस जनतेने हक्काच्या पशासाठी त्रास सहन केला. अनेकांचा रांगेत उभे राहून मृत्यूही झाला. उद्योगधंदे अडचणीत आले असून, विकास दर दोन टक्क्यांनी कमी होणार असल्याने देशात सर्वात मोठे आíथक संकट उभे राहिले आहे. काळा पसा बाहेर काढण्याची आणि जमा झालेला बँकेतील पसा जनधन खात्यावर सर्वसामान्य लोकांना देण्याची भलावण केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात पाच हजार कोटी रुपये काळा पसाही बाहेर आला नाही. नोटाबंदीचा निर्णय हा डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखा झाला असल्याने काँग्रेसच्या वतीने ८ जानेवारीला सर्व तहसील कार्यालयांवर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे निरीक्षक शिवाजी कव्हेकर यांनी दिली.

बीड येथे सोमवारी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी पत्रकार बठक घेऊन नोटाबंदी विरोधी काँग्रेसच्या आंदोलनाबाबत माहिती दिली. या वेळी कव्हेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन खात्यावर पसा जमा होणार असल्याची आशा दाखवून लोकांना नोटाबंदीनंतर पन्नास दिवस त्रास सहन करायला लावला.

हक्काच्या पशासाठी रांगेत उभे राहून अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. तरीही जनता सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत नाही. कारण भाजपने जनधन खात्यावर पसे जमा होणार असल्याचे आणि काळा पसा बाहेर काढण्याचे आमिष दाखवले. प्रत्यक्षात हा निर्णय देशाचे नुकसान करणारा ठरला असून, पन्नास दिवसांत दहा टक्केही व्यवहार झाले नाहीत. दोन टक्क्यांनी विकास दर कमी झाला. जगात एकही देश संपूर्ण रोकडरहित झालेला नाही. असे असताना भारत रोकडरहित कसा होईल? यामुळे या निर्णयाच्या विरोधात काँग्रेसने देशपातळीवर आंदोलन सुरू केले आहे. ६ जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आणि ८ जानेवारीला सर्व तहसील कार्यालयावर घंटानाद आंदोलन केले जाणार आहे.