अंबाजोगाई नगरपालिका निवडणूक प्रचारात प्रभाग तीनमधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार गणेश मसने यांना मतदारांना पसे वाटप करताना प्रतिस्पर्धी भाजप व मनसेच्या उमेदवारांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी मसने यांच्याजवळील ५९ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त करून शहर ठाण्यात गुन्हा नोंदवून ताब्यात घेऊन जामिनावर सोडून दिले.

अंबाजोगाई नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व मनसे पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला असून, परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली आहे. मंगळवारी सकाळी काँग्रेसचे उमेदवार गणेश मसने हे आपल्या प्रभागात मतदारांना पसे वाटत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रतिस्पर्धी मनसेचे उमेदवार उमेश पोखरकर यांनी त्या ठिकाणी जाऊन मसने यांना पकडून पोलिसांना बोलावले.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मसने यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडील ५९ हजार ५०० रुपयांची रोकडही जप्त केली. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. तर उमेदवार गणेश मसने यांनी आपल्या प्रभागात प्रचार करत असताना विरोधी उमेदवारांनी येऊन धक्काबुक्की करत त्यांच्याजवळील पसे आपल्या खिशात टाकले आणि पोलिसांना बोलावून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे.