औरंगाबाद : नगरपालिका निधीतील असमतोलामुळे काँग्रेस आमदारांमध्ये महाविकास आघाडी सरकारविरुद्ध निर्माण झालेली खदखद आता बाहेर पडत असून ११ आमदार उपोषणाच्या तयारीत असल्याची माहिती जालन्यातील काँग्रेस आमदार कैलास गोरंटय़ाल यांनी दिली.

काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत रविवारी दृकश्राव्य माध्यमातून घेण्यात आलेल्या बैठकीतही या मुद्दय़ावर चर्चा करण्यात आली. उपोषण किंवा आंदोलनाबाबत या संवाद कार्यक्रमात चर्चा झाली नाही. विशेष म्हणजे खदखद व्यक्त करणारे आमदार गोरंटय़ालही या बैठकीस उपस्थित नव्हते. मात्र, काँग्रेसमधील नगरपालिकांचे अध्यक्षपद भूषवून आमदार झालेले नेते अधिक नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नगरपालिकांना निधी देताना दुजाभाव केला जात आहे. काही मतदारसंघांत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून दुजाभाव केला जातो. काँग्रेसची सत्ता असणाऱ्या नगरपालिकांमध्ये निधी मिळत नसल्याची तक्रार घेऊन दहा आमदार प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही  भेटले आहेत.

नगर परिषदांना विकास विषयक निधी देताना राज्यात काँग्रेस आमदारांवर अन्याय होत आहे. माझ्यासह अकरा आमदारांनी काँग्रेस प्रदेशाध्यांची तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. निधीच्या असमतोलाचे गाऱ्हाणे त्यांच्या कानावर घातले आहे. काँग्रेसशिवाय अन्य पक्षातील आमदारांच्या सांगण्यावरून निधी देण्याचे प्रकार घडले आहेत.

 – कैलास गोरंटय़ाल, आमदार