News Flash

काँग्रेस-राष्ट्रवादीत पक्षांतर्गत कलह

दोन्ही काँग्रेसमध्ये कुरबुरी वाढल्या आहेत.

मराठवाडय़ात नगरपालिकांमधील यशानंतर नेत्यांमधील कुरबुरींत वाढ 

मराठवाडय़ात नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ताधारी भाजपच्या तुलनेत चांगले यश मिळाल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांना अचानक बळ आले. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये कुरबुरी वाढल्या आहेत. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाने थेट प्रदेश नेतृत्वाला लक्ष्य केले असताना, राष्ट्रवादीतही अजित पवारांचे निकटवर्तीय आमदार सतीश चव्हाण यांच्यावर स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची खप्पामर्जी झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्य़ातील चारपैकी दोन पालिकांची नगराध्यपदे मिळाली तरी काँग्रेसमध्ये अंतर्गत कुरघोडय़ा सुरू झाल्या. जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देताना जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना लक्ष्य केले. जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार हे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना विचारल्याशिवाय काही जाहीर बोलणार नाहीत, असे मानले जाते. ते चव्हाणांचे विश्वासू म्हणून त्यांच्याकडे औरंगाबादचे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. खरे तर बोलताना भीडभाड न बाळगणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. एखाद्याला जाहीरपणे काही सुनावायचे असेल तर त्यांचा उपयोग केला जातो. आघाडी सरकारच्या काळात औरंगाबादचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात असताना आमदार सत्तार यांनी त्यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले होते. एका कार्यकर्त्यांला केलेल्या मारहाणीमुळे सत्तार यांचे मंत्रिपद गेले होते. कोणत्याही बैठकीत सहजपणे विषय सोडूनही ते मोठय़ांदा बोलत असतात. त्यामुळे सत्तार यांचे वक्तव्य काँग्रेस पक्षात गांभीर्याने घेतले जात नाहीत. मात्र या वेळी बाळासाहेब थोरात आणि अब्दुल सत्तार यांची भाषा थेट विखेंविरोधाची असल्याने काँग्रेसमध्ये विखेंविरोधातील मोहीम अधिक तीव्र होईल, असे मानले जाते. नगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाने ‘आर्थिक’ रसद पुरविली नाही, असे सत्तार यांचे मत होते. साधा झेंडासुद्धा पक्षाने दिला नाही, असे ते सांगत होते. उमेदवारांच्या अपेक्षा अधिक आणि पक्षाकडून होणारी मदत कमी असे त्यांना सांगायचे होते. परिणामी, नगरपालिका निवडणुकीमध्ये पुरेसे यश मिळाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विखे विरोधाची ही धार प्रदेशाध्यक्षांच्या सहमतीशिवाय होणार नाही, असा दावा केला जात आहे.

एका बाजूला औरंगाबादमधून विखेंना लक्ष्य करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच लातूरच्या काँग्रेसमध्येही सारे काही आलबेल नसल्याचे वक्तव्य आमदार अमित देशमुख यांच्याच तोंडी आले. यापुढे ‘काकां’चे ऐकणार असे ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्याला साखर कारखाना कसा चालवावा असे संदर्भ असले तरी त्याची पाश्र्वभूमी मात्र नगरपालिका निवडणुकीच्या पराभवाची होती. यापुढे ‘काकां’चे म्हणजे आमदार दिलीप देशमुख यांचेच ऐकणार, असे त्यांनी सांगितले. याचा अर्थ गेले काही दिवस ते त्यांचे म्हणणे पद्धतशीरपणे डावलत होते, असा अर्थ काढला जात आहे. तो खराही असल्याचे कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे विलासराव देशमुखांच्या पश्चात लातूरच्या काँग्रेसमध्येही पुलाखालून बरेच पाणी गेल्याचे सांगितले जाते. बीडमधील काँग्रेसचे नेते तसे अज्ञातवासात असल्यासारखे जिल्हय़ात काम करतात. उस्मानाबादमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री मधुकर चव्हाण यांना काही सुधारणा करता आली नाही. आमदार बसवराज पाटील जरी उस्मानाबाद जिल्हय़ातील मुरूमचे असले तरी त्यांचे अध्रे लक्ष औसा मतदारसंघात असते. त्यांनाही निवडणुकांमध्ये चमकदार कामगिरी बजावता आली नाही. फक्त नांदेडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांतील जिवंतपणा अशोकराव चव्हाण यांनी टिकवून ठेवला आहे. खरे त्यांनी संपूर्ण मराठवाडय़ात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. मराठवाडय़ातील घडीच त्यांना नीट बसवता येत नाही, असा संदेश अलीकडच्या घटनांमधून व्यक्त होत आहे.

आमदार चव्हाणांची कार्यशैली थेट ‘कानपुरी’ असल्याचे त्यांनी सांगितले. ते धनशक्तीचा वापर करून राजकारण करतात असे कोणी म्हणाले, तर कोणी सांगितले, ते इतर पक्षाशी हातमिळवणी करतात. या पत्रकार बैठकीमुळे राष्ट्रवादीमध्ये अनेक गटतट पडल्याचे समोर आले. भाजपला मिळालेल्या यशाच्या पाश्र्वभूमीवर मराठवाडय़ात काँग्रेस,  राष्ट्रवादीतील कुरबुरी समोर येऊ लागल्या आहेत.

  • काँग्रेसमध्ये जशी कुरबुर सुरू आहे, तसेच राष्ट्रवादीमध्येही होती. नुकतीच आमदार सतीश चव्हाण यांच्या एका वक्तव्यामुळे ती कुरबुर चव्हाटय़ावर आली.
  • औरंगाबादच्या निवडणुकीचे सूत्रे सुरेश धस यांच्याकडे दिल्याने ते नाराज होते. त्यांनी त्यांच्यावर एक तिरकस टोमणा मारला आणि राष्ट्रवादीतील आमदार चव्हाण विरोधी गट एकवटला. त्यांच्या ठेकेदारीपासून ते पक्षाचे नेते शरद पवार आल्यानंतर ते त्यांचे कसे कान भरतात, याची रसभरीत वर्णने माजी आमदार संजय वाघचौरे, प्रदेश उपाध्यक्ष मौलना कदीर यांनी पत्रकारांसमोर केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 1:13 am

Web Title: congress ncp internal issue in marathwada
Next Stories
1 आर्थिक निकषावरील आरक्षणास विरोधच
2 दर घसरल्याने कांद्यानंतर आता ‘आले’ उत्पादकही अडचणीत
3 ठेकेदार घुसवल्याने ‘जलयुक्त शिवार’ फसले
Just Now!
X