06 December 2019

News Flash

पाच प्रदेश सरचिटणिसांच्या जिल्हय़ात काँग्रेसचे पानिपत

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच एका जिल्हय़ात पाच प्रदेश सरचिटणीस नियुक्त केले

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच एका जिल्हय़ात पाच प्रदेश सरचिटणीस नियुक्त केले असून, तो भाग्यवान जिल्हा म्हणून लातूर ओळखले जाते. नेमक्या याच जिल्हय़ात नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे सुपुत्र शैलेश पाटील चाकूरकर, मानसपुत्र आमदार बसवराज पाटील मुरूमकर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे सुपुत्र अशोक पाटील व मानसपुत्र माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांच्यासह माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख या पाच जणांना काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्त करून काँग्रेसची चारही पालिकांमध्ये केविलवाणी अवस्था झाली आहे.

नियुक्तीनंतर पहिल्यांदाच नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने या नेत्यांचा कस लागला. औसा, निलंगा व अहमदपूर या चार नगरपालिकेत काँग्रेसला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावे लागले. या तिन्ही ठिकाणी दस्तुरखुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सभा झाल्या होत्या व प्रदेश सरचिटणीस आमदार अमित देशमुख यांनी शेवटच्या दिवशी तिन्ही ठिकाणी सभा घेतल्या होत्या. शिवराज पाटील चाकूरकरांनी औशात सभा घेतली होती. निलंग्यात माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी विविध प्रभागात मतदारांना विनंती केली होती.

उदगीर पालिकेत सुरुवातीपासून काँग्रेसची सत्ता होती. अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी आमदार अमित देशमुख यांची शुभारंभाची सभा झाली व त्यानंतर कोणत्याही नेत्याची सभा घेण्याची आम्हाला गरज नाही, असे सांगत उदगीरवासीयांनी कोणालाही बोलावले नाही. ज्या जिल्हय़ात काँग्रेस पक्षाचे पाच प्रदेश सरचिटणीस आहेत, त्या जिल्हय़ात काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. चारपकी एकाही पालिकेत सत्ता आली नाही. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे कंबरडे मोडल्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक व त्यानंतर होणाऱ्या लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या अंगात बळ कुठून आणायचे, हा मोठा प्रश्न सर्वाच्या समोर उभा राहणार आहे.

First Published on December 17, 2016 1:53 am

Web Title: congress party in latur
Just Now!
X