अवसान गेल्यासारखे सरकारविरोधी घोषणा देणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आता बदलू लागल्याचे चित्र औरंगाबादमध्ये दिसू लागले आहे. नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्याचा दिवस काळा दिन म्हणून पाळताना काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे यांनी मुंडन केले.  त्या आंदोलनानंतर शुक्रवारी काढण्यात आलेल्या तालुका मोर्चातही काँग्रेसने बैलगाडय़ा रस्त्यावर आणल्या. मोर्चा काढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातात सरकारविरोधाचे फलकही झळकाविण्यात आले. त्यामुळे काँग्रेसने किमान आंदोलनाच्या पातळीवर तरी मरगळ झटकल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नोटाबंदीचे श्राद्ध घालत मुंडन करणारे आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढील निवडणुकीत मतदान होईपर्यंत डोक्यावर केस उगवू देणार नाही, असे आज मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले.

औरंगाबाद शहरात आणि जिल्ह्य़ात काँग्रेसची ताकद तशी कमीच. सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार आणि फुलंब्रीमध्ये सातत्याने आंदोलन करून कार्यकर्ता सतत कामात राहावा, यासाठी प्रयत्न करणारे माजी आमदार कल्याण काळे वगळता पक्ष वाढीसाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. काँग्रेसच्या आंदोलनालाही तशी धार दिसून येत नव्हती. मात्र, गेल्या आठवडय़ापासून आंदोलनासाठी काँग्रेसचे नेते ऐवज जमवू लागले आहेत. नोटाबंदीच्या विरोधात मुंडन करण्यासाठी न्हावी आंदोलनाच्या ठिकाणी आणले होते. आजही बैलगाडी सजवून काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. औरंगाबाद तालुक्यातील कार्यकर्त्यांना आमंत्रण देऊन शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.

यापुढे सरकारचा निषेध करण्यासाठी डोक्यावर केस उगवू देणार नाही, असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले. पुढील काळात काँग्रेस अधिक आक्रमकपणे काम करणार असून पुढील सर्वात मोठा मोर्चा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांच्या मतदारसंघात काढणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले. डोक्यावर केस न ठेवण्याच्या सत्तार यांच्या कृतीची मात्र खिल्ली उडविली जात आहे. ‘त्यांच्या डोक्यावर पूर्वी केस नव्हतेच. त्यामुळे त्यांची ही घोषणा केवळ स्टंटबाजी आहे,’ अशी टीका भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली. गेल्या काही दिवसांत काँग्रेसच्या आंदोलनातून मरगळ झटकल्याचे चित्र दिसून येत आहे.