राष्ट्रवादीबरोबरच्या चर्चेत मागणी

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी सुरू असणाऱ्या आघाडीच्या बोलणीमध्ये नगरची जागा काँग्रेस पक्षाने लढवावी, असा मतप्रवाह आहे. तशी चर्चा सुरू असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खासदार व्हावे अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यांच्याशी या पूर्वी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी बोलणी केली होती. त्यांच्या पक्षाशी बोलणी करण्याची इच्छा आहे, असे सांगतानाच ‘एमआयएम’ पक्ष जातीयवादी असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे एमआयएम वगळून प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणी होऊ शकतात, असे संकेत चव्हाण यांनी दिले. दुष्काळ चिंतन बैठकीसाठी ते येथे आले होते. त्यांच्या समवेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.

आघाडी संदर्भात सुरू असणाऱ्या चर्चेत अद्याप मतदारसंघाच्या अदलाबदलीबाबत फारशी चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले. मराठवाडय़ातील औरंगाबादची जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडावी, असा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठेवला होता. या पाश्र्वभूमीवर ते म्हणाले, अद्याप यावर फारशी चर्चा झाली नाही. मात्र, नगर लोकसभेची जागा काँग्रेसने लढवावी, अशी इच्छा आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार कोण या विषयी सुरू असणाऱ्या चर्चेलाही त्यांनी बगल दिली. काही इच्छुक उमेदवार तयारी करीत आहेत. त्यात आमदार सुभाष झांबड यांचेही नाव आहे. मात्र, वेगवेगळ्या पातळ्यांवर परीक्षण केल्यानंतर उमेदवारी ठरविली जाते. अद्याप असे कोणतेही नाव नक्की ठरले नाही, असे ते म्हणाले.

हिंगोली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्यास खासदार राजीव सातव तयार नसल्याचे सांगण्यात येत होते. गुजरातचे प्रभारी पद असल्याने लोकसभा मतदारसंघात वेळ पुरणार नाही, असे ते सांगत होते. या विषयी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, अद्याप त्यांच्याशी अशी चर्चा झाली नाही. मात्र, ते लोकसभा मतदारसंघात न येताही निवडून येऊ शकतात. जालना मतदारसंघातही काँग्रेसकडे सक्षम उमेदवार असल्याचा दावा त्यांनी केला.

अजून ठरलेले नाही

नांदेड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवायची की विधानसभा निवडणूक लढवायची या विषयी बोलण्यास प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी टाळले. ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ असे ते म्हणाले.

‘एम. जे. अकबर यांना हटवा’

परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार महिला मंत्र्यांकडे आहे. एवढय़ा महिलांनी  एम. जे. अकबर यांच्या विरोधातआरोप केल्यानंतर त्यांचा राजीनामा तर सोडाच पण त्यांची हकालपट्टी व्हायला पाहिजे होती. सुषमा स्वराज ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांनी स्वत: पंतप्रधान मोदी यांच्याकडे जाऊन त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. त्यांची हकालपट्टी व्हायला हवी, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.