लातूर हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला, पण या बालेकिल्ल्याला नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपने सुरुंग लावला. राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा मान लातूरच्या विलासराव देशमुख यांना मिळाला, पण लातूरचा विकास झाला नाही या मुद्दय़ावर भाजपने काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असतानाच काँग्रेसने आधुनिक लातूरचे स्वप्न रंगविले आहे. काँग्रेस आणि भाजप या दोघांनीही ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.

लातूर नगरपालिकेच्या स्थापनेपासून १९९५ चा अपवाद वगळता सातत्याने काँग्रेसचे वर्चस्व राहिले. शिवराज पाटील चाकूरकर यांनी या नगरीचे नगराध्यक्षपद भूषविले होते. लातूर म्हटल्यावर विलासराव देशमुख हे समीकरण होते. राज्याचे नेतृत्व करणाऱ्या विलासरावांना लातूरकरांनी १९९५चा अपवाद वगळता नेहमीच साथ दिली. विलासरावांच्या निधनानंतर लातूरचे नेतृत्व त्यांचे पुत्र अमित देशमुख यांच्याकडे आले. लागोपाठ दोन विधानसभा निवडणुकांमध्ये ते विजयी झाले. काँग्रेस आघाडी सरकारच्या अखेरच्या काळात त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले. पण अमितभय्यांच्या नेतृत्वाला मर्यादा येऊ लागल्या. जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या वर्चस्वाला भाजपने सुरुंग लावला. नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये   भाजपने काँग्रेसचा पराभव केला. याचीच पुनरावृत्ती लातूर महानगरपालिकेत करण्याची भाजपची योजना आहे.

जिल्हय़ातील नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यामुळे काँग्रेसची मंडळी चिंतेत होती, मात्र उदगीर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाल्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या आशा उंचावल्या. आमदार अमित देशमुख यांच्या सोबतीला आमदार दिलीपराव देशमुख, आमदार बसवराज पाटील मुरुमकर हे प्रभागात सभा घेत असून तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण, माजी पालकमंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. पतंगराव कदम यांच्या जोरदार सभा झाल्या. ‘होय हे काँग्रेसनेच केले’ या प्रचाराच्या फलकानंतर आता ‘पिढय़ान पिढय़ांचे नाते जपुया’ असा दुसरा टप्पा प्रचाराचा सुरू झाला आहे. ‘माझे लातूर, मी लातूरचा’ ही ध्वनिफीतही प्रचारात चांगलीच रंगत आणते आहे.  लातूरकरांना रेल्वेने पाणी पाजणे ही काही भूषणावह गोष्ट नाही. केंद्र व राज्य सरकारने वेळीच उपाययोजना न केल्यामुळे लातूरकरांवर पाणीटंचाई ओढवली असा टोला आमदार अमित देशमुख यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत लगावला, तर सातत्याने हाती सत्ता असतानाही पाण्याच्या प्रश्नाचे नियोजन करता आले नाही. राज्य शासनाने पसे पाठवूनही त्याचा वापर करण्याची पतच काँग्रेसकडे नसल्यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली असा पलटवार पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. लातूरकर लातूरचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेत, त्यांना बाहेरच्या नेतृत्वाची गरज नाही असा दावा करत लातूरकरांना यापूर्वी उस्मानाबादकरांनी डिवचण्याचा प्रयत्न केला होता. आता निलंग्याची मंडळी लातूरकरांना विकासाचा सल्ला द्यायला निघाले आहेत, अशी उपरोधिक टिप्पणी आ. अमित देशमुख यांनी केली. तर कधी उस्मानाबाद, कधी नांदेड तर आता निलंगा अशांच्या नावांनी बोटे मोडण्याची सवय ज्यांना लागली आहे ती मंडळी पुन्हा एकदा स्वतच्या नाकत्रेपणाचे खापर इतरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण लातूर जिल्हय़ाचे पालकमंत्री असल्यामुळे बाहेरचे म्हणून हिणवण्याचा प्रश्नच येत नाही. जिल्हय़ाच्या सर्वागीण विकासाकडे यापूर्वी लक्ष न दिले गेल्यामुळे अशा कोत्या वृत्तीतून टीका करण्याची सवय जडली असल्याची जळजळीत प्रतिक्रिया संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी स्वबळावर

राष्ट्रवादी काँग्रेसने एकला चलोची भूमिका घेत आ. राणा जगजीतसिंह यांच्या नेतृत्वाखाली प्रचारयंत्रणा राबवली जात आहे. शिवसेना ही स्वबळावर लढत असून अर्धी सेना भाजपने गिळंकृत केल्यामुळे शिवसनिक नाराज झाले आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी व एमआयएमच्या परिवर्तन आघाडीने ३६ उमेदवार निवडणुकीच्या िरगणात उतरवले असून ओवेसी यांच्या दोन सभाही झाल्या आहेत. शिवाय गुरुवारी त्यांची पदयात्रा झाली. प्रचाराच्या सांगतेला पुन्हा एकदा ओवेसी लातुरात दाखल होणार आहेत. दलित, मुस्लीम मतांवर डोळा ठेवून ओवेसी प्रचाराचे रान उठवत आहेत. यामुळे काँग्रेसची मंडळी अस्वस्थ आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कोण किती व कशी बाजी मारतो, याकडे मतदार लक्ष ठेवून आहेत.

काँग्रेसने लातूरकरांसाठी काय केले? – निलंगेकर

सातत्याने सत्तेत असूनही पाणी, कचरा, रस्ते या मूलभूत प्रश्नांकड काँग्रेसने दुर्लक्ष झाल्याची टीका पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. जनतेने प्रचंड मतांनी सत्ता हाती दिल्यानंतरही आमच्याशिवाय सत्ता कोण राबवणार या धुंदीत काँग्रेसने जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. पाण्याच्या मूलभूत प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्यामुळे गतवर्षीच्या उन्हाळय़ात रेल्वेने लातूरकरांची तहान भागवण्याची वेळ आली. कचऱ्यापासून खतनिर्मिती, वीजनिर्मिती केली जाईल अशी आश्वासने दिली. प्रत्यक्षात कचऱ्याची विल्हेवाट योग्यप्रकारे न लावल्यामुळे हरित लवादाने ताशेरे ओढले आहेत. शहरवासीय दरुगधीने त्रासले आहेत. ठरावीक कंपूच्या गराडय़ात काँग्रेस अडकली असून शहराच्या विकासापेक्षा गुत्तेदारांच्या विकासात काँग्रेसला रस असल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला आहे. भाजपच्या प्रचाराची संपूर्ण धुरा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर असून त्यांना उदगीरचे आ. सुधाकर भालेराव, अहमदपूरचे आ. विनायक पाटील, खा. सुनील गायकवाड हे साहाय्य करत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जाहीर सभा गुरुवारी झाली. शनिवारी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची सभा होणार असून प्रचाराच्या सांगता समारंभास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. प्रचारासाठी जादूगार, पथनाटय़, भल्या पहाटे येणारे वासुदेव अशा आगळय़ावेगळय़ा प्रचारतंत्राचा वापर भाजपकडून केला जातो आहे.