औरंगाबाद :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संशोधन संस्थेच्या संचालकपदी वयोमर्यादेची अट ओलांडल्यानंतर राज्यपालांनी केलेल्या नियुक्तीवरून गदारोळ सुरू  झाला आहे. व्यवस्थापन परषिदेचे सदस्य संजय निंबाळकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

व्यवस्थापन परिषदेने वयोमर्यादेचे कारण सांगून अन्य व्यक्तीकडे पदभार देण्याचा ठराव घेतल्यानंतरही राजकीय पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल कार्यालयाकडे पाठपुरावा करून ही नियुक्ती करवून घेतली. या नियुक्तीबाबत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी महिनाभरात निर्णय बदलण्यासाठी पाठपुरवा करू असे आश्वासन दिल्याने वादावर पडदा पडला. विद्यापीठस्तरावरील नियुक्यांबरोबर राज्य सरकारकडून मान्यता दिलेल्या ६६ पैकी ५२ महाविद्यालयांना मान्यता देणे योग्य होणार नाही, अशी शिफारस व्यवस्थापन परिषदेने कायम ठेवली आहे.

गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संशोधन संस्थेच्या संचालकपदी काम करणारे रमेश पांडव यांचे वय आता ६५ वर्षांपेक्षा जास्त असल्याने त्यांच्याऐवजी अन्य प्राध्यापकाकडे पदभार सोपवावा, असा ठराव ८ फेब्रुवारी रोजी व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला होता. मात्र, राज्यपालांनी पुन्हा एकदा पांडव यांना मुदतवाढ दिली. त्यामुळे डॉ. भगवान साखळे या दुसऱ्या व्यक्तीस पदभार घेता आला नाही. या अनुषंगाने संजय निंबाळकर यांना विचारणा केली असता त्यांना राज्यपालांचे पत्र दाखविण्यात आले. मात्र, अशा प्रकारे मुदतवाढ देण्यास कोणत्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांकडे शिफारस केली, याचा उलगडा न झाल्याने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत वाद झाला.

‘चला महाविद्यालय काढू’च्या प्रक्रियेला चाप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत तब्बल ६६ प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केले. मंजूर केलेल्या प्रस्तावापैकी केवळ १२ प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेने शिफारस केलेले होते. अन्य सारे प्रस्ताव राज्य पातळीवर शिक्षण मंत्र्यापर्यंत कोणी पाठविले. त्रुटी असणारे प्रस्ताव मंजूर कसे झाले असे प्रश्न आता उपस्थित केले जात असून केवळ पाच महाविद्यालये वगळता अन्य सारे प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेत फेटाळण्यात आले. यामध्ये शिवसेना नेत्यांचे प्रस्ताव अधिक होते. राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत, अर्जुन खोतकर या नेत्यांच्या संस्था अग्रभागी होत्या. केवळ कन्नड तालुक्यात २३ महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. यावर आता कन्नडसाठी स्वतंत्र विद्यापीठ उघडू अशी तिरकस टिपणीही संजय निंबाळकर यांनी केली.