गेल्या ४०० वर्षांंपासून औरंगाबाद शहराचे पाण्याचे नियोजन यशस्वीपणे राबविण्यात आले. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पाश्र्वभूमीवर पाणी, रस्ते, स्वच्छता या सर्व बाबतीत उत्कृष्ट नियोजन करून विद्यापीठ परिसराचे रुपांतर ‘स्मार्ट व्हिलेज’ मध्ये करण्यात येईल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जलपुनर्भरण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या तयारी संदर्भात स्वयंसेवी संस्था व राष्ट्रीय सेवा योजना गट समन्वयक, कार्यक्रमाधिकारी यांची कार्यशाळा बुधवारी (दि. ३०) महात्मा फुले सभागृहात घेण्यात आली. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठाने पाच गावे दत्तक घेतली असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ही गावे स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. नसíगक वरदान लाभलेल्या विद्यापीठ परिसरात पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यात येईल. स्वयंसेवी संस्था, सीएमआयएच्या माध्यमातून विहीर पुनर्भरण, तलावनिर्मिती, वृक्ष संवर्धन आदी उपक्रम राबविण्यात येतील. यासाठी स्वयंसेवी संस्था, उद्योजक, सामाजिक कार्यकत्रे यांनी विद्यापीठास सहकार्य करावे, असे आवाहनही कुलगुरू यांनी केले.
निसर्गाचा कोप असलेल्या मराठवाडय़ात नदीचे पाणी वाटपही न्याय्य रीतीने झालेले नाही. डॉ. राजेंद्र सिंह राणा यांचा पॅटर्न वापरून जल संवर्धनाचे काम तातडीने न सुरू केल्यास मराठवाडय़ाचे वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही, असे मत सेंट्रल फॉर रूरल वेल्फेअरचे डॉ. सतीश चव्हाण यांनी दिला. ‘मराठवाडय़ातील पाणी समस्या व जलपुनर्भरण’ या विषयावर येत्या २८ जानेवारी रोजी राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे डॉ. सुहास मोराळे यांनी सांगितले. चार जिल्हय़ातील २४० महाविद्यालयातील ३२ हजार स्वयंसेवकांच्या माध्यमातून हे अभियान यशस्वी करण्यात येईल, असे प्रास्ताविकात डॉ. राजेश करपे म्हणाले. डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.