News Flash

सहकारमंत्र्यांच्या ‘लोकमंगल’मध्ये घोटाळा

सोलापूर जिल्हय़ात लोकमंगल या ग्रुपचा विविध क्षेत्रात दबदबा आहे.

७४ कोटी सव्याज परताव्याचे आदेश

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल अ‍ॅग्रो या कंपनीने साखर कारखान्यासाठी ४ हजार ७५१ गुंतवणूकदारांकडून जमविलेली तब्बल ७४.८२ कोटी रुपयांची गुंतवणूक सेबीच्या नियमांविरुद्ध असल्याने ही रक्कम शेतकऱ्यांना सव्याज परत करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झालेली ही फसवणूक थेट सुब्रोतो रॉय यांनी केलेल्या घोटाळय़ासारखीच असल्याचे नमूद करून लोकमंगल अ‍ॅग्रोच्या १२ संचालकांना रोखे बाजारात व्यवहार बंदी करण्याचे आदेश सेबीकडून देण्यात आले आहेत.सुभाष देशमुख यांच्या कंपनीने २००९ ते २०१५ या कालावधीत शेतकऱ्यांकडून ही रक्कम गोळा केली होती. सहकारमंत्र्यांच्या या व्यवहाराची थेट सहाराच्या व्यवहाराशी सांगड घातलेली असल्याने फडणवीस सरकार पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्हय़ात लोकमंगल या ग्रुपचा विविध क्षेत्रात दबदबा आहे. त्याच जोरावर देशमुख यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे, असा आग्रह धरला गेला होता. त्यास केंद्रातील एका मंत्र्याची साथ होती. लोकमंगलमार्फत उभारावयाचा हा कारखाना नक्की कोणत्या जिल्हय़ातील हे आदेशात नमूद नाही. लोकमंगल अ‍ॅग्रोकडून उस्मानाबाद जिल्हय़ातील लोहारा तालुक्यातही एक कारखाना काढण्यात आला आहे. या कारखान्यासाठी शेतकऱ्यांना माहीत नसताना ‘इको’ या बँकेकडूनही कर्ज घेण्यात आले होते.

दोन हजार शेतकऱ्यांच्या नावे २० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. शेतकऱ्यांनी या प्रकरणी तक्रारी केल्यानंतर या रकमेची परतफेड लोकमंगलने केल्याच्या नोंदी आहेत.

प्रकार काय?

लोकमंगल अ‍ॅग्रो ही कंपनी ९९.९६ कोटी रुपयांच्या भांडवलातून उघडण्यात आली. यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह महेश सतीशचंद्र देशमुख, स्मिता सुभाषचंद्र देशमुख, वैजिनाथ नागप्पा लातुरे, अनिल वसंतराव पांढरे, पराग सुरेश पाटील, औदुंबर संदीपान देशमुख, शहाजी गुलचंद पवार, गुरुण्णा अप्पाराव तेली हे संचालक आहेत. रजिस्टर ऑफ कंपनीज् यांनी सेबीला ८ ऑगस्ट रोजी एक पत्र लिहून लोकमंगल अ‍ॅग्रोच्या आर्थिक ताळेबंदाच्या आधारे तांत्रिक तपासणी आवश्यक असल्याचे कळविले. १ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०१३ दरम्यान ११ कोटी ५९ लाख २० हजार ५०० रुपयांची रक्कम देय असल्याचे कळविले. लोकमंगलने शेतकऱ्यांकडून ७४ कोटी ८२ लाख रुपये नियमबाहय़रीत्या गोळा केले. प्रतिदिन ४९ जणांनी शेअर्स घेतले अशा नोंदी घेऊन ही रक्कम गोळा करण्यात आली. सेबीने लोकमंगल अ‍ॅग्रोला या विषयीची विचारणा केली असता त्यांनी ही रक्कम गोळा केल्याचे मान्य केले. कंपनी कायद्यातील अनेक कलमांचा भंग करून लोकमंगलने केलेली ही गुंतवणूक सव्याज परत करायला हवी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

नियम उल्लंघन असे झाले

  • कंपनी कायद्याप्रमाणे विहित ४९ या मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूकदारांकडून निधी उभारणी.
  • कंपनी निबंधकांकडे ‘सार्वजनिकरीत्या भांडवल उभारणी’ साठी आवश्यक ते प्रस्ताव दाखल नाहीत.
  • निधी गोळा केल्यापासून १० आठवडय़ांच्या आत समभागांची मान्यताप्राप्त शेअर बाजारात सूचिबद्धता नाही.
  • भागधारकांकडून गोळा केलेल्या रकमेसाठी स्वतंत्र बँक खाते नाही.
  • सामान्य भागधारकाला गुंतवणूक परत घेण्याचा मार्ग बंद असणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 1:30 am

Web Title: cooperation minister subhash deshmukh lokmangal scam
Next Stories
1 स्थायी समितीच्या मंजुरीआधीच कंत्राटदारास कार्यारंभ आदेश
2 जायकवाडी ६३.४ टक्क्यांवर!
3 परभणीत शासकीय गोदामात पाच कोटीचा धान्य घोटाळा
Just Now!
X