औरंगाबाद  :  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यच्या सुनावणीच्या दिवशीच पोलीस नाईकाने खोकडपुरा येथील बंजारा कॉलनीच्या बहादूरपुरा भागात सोमवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. उमाकांत पद्माकर पाटील (वय ५२) असे मृत पोलीस नाईकाचे नाव आहे. ते जळगाव जिल्ह्यतील पाचोरा येथील मूळ रहिवासी होते. तसेच ते सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. त्यांचा एक मुलगा दिल्लीला कंपनीत नोकरीला आहे. तर मुलीचा विवाह झालेला आहे.  वाहतूक शाखेत कार्यरत असताना काही वर्षांपूर्वी त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्याच गुन्ह्यची सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता होती. दरम्यान, २२ सप्टेंबर रोजी रात्री जेवण केल्यानंतर ते झोपी गेले होते. मात्र, पहाटे पाचच्या सुमारास त्यांच्या पत्नीला उमाकांत पाटील हे खोलीत दिसले नाही. पाटील यांनी जिन्याखाली गळफास घेतल्याचे पत्नीच्या निदर्शनास आले. या घटनेची नोंद क्रांतीचौक पोलीस ठाण्यात करण्यात आली.