औरंगाबाद : देहदानाची तीव्र इच्छा होती. पण आड आला करोना. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आपला देह मृत्यूपश्चात कामी यावा ही मनी बाळगलेली अनेकांची अखेरची इच्छा, संकल्प अधुराच राहिला. कुटुंबीयांनाही मृत व्यक्तीच्या देहदानाच्या इच्छेला करोनामुळे तिलांजली द्यावी लागली. परिणामी वैद्यकीय महाविद्यालयांना मागील वर्षभरात जेमतेम मृतदेहच दान रूपात मिळाले आहेत. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला करोनापूर्व काळात दरवर्षी साधारणपणे २५ मृतदेह मिळायचे. मात्र, मागील वर्षभरात जेमतेम ४ ते ५ एवढय़ा कमी संख्येने देहदान झालेले आहे.

नेत्रदानाविषयी बऱ्याच प्रमाण जशी जनजागृती झाली, तशी देहदानाविषयी नाही. परिणामी देहदानाचा संकल्प करणारे बोटावर मोजण्याइतकेच सापडतात. त्यातही देहदान करण्याचा संकल्प केलेल्या व्यक्तींच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांकडून त्याची पूर्तता होतेच असे नाही. कधी देहदानाची प्रक्रिया कशी असते याच्या माहितीअभावी रखडले जाते तर संकल्प करून ज्या रुग्णालयात अर्ज दाखल केलेला असतो, त्या शहराऐवजी मृत्यू आलेले ठिकाण दूर असल्याच्या कारणानेही देहदानाचा संकल्प प्रत्यक्षात उतरला जात नाही.

त्यात गतवर्षी करोना महामारीची सुरुवात झाली. करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे मृत्यूपश्चातील देह स्वीकारता येत नाही. तशा वैद्यकीय क्षेत्राकडून सूचना असल्यामुळे करोना संसर्गित मृतदेह स्वीकारला जात नाही. त्यामुळे देहदानाचा संकल्प करूनही केवळ करोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांचा मृतदेह वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणांच्या कामी येऊ शकला नाही.

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या देहदान विभागाच्या डॉ. प्रतिमा कुलकर्णी यांनी सांगितले, की दरवर्षी घाटीला साधारण २५ व्यक्तींचे मृत्यूपश्चातील देह मिळतात. त्यांच्या संकल्पानुसार देहदान केले जाते. ते घाटीला विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करूनच स्वीकारले जातात. मात्र, गतवर्षांत करोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे त्यांच्या संकल्पानुसार देहदान करता आले नाही.

मागील महिन्यात (मे) तीन मृत व्यक्तींचे देहदान करण्यात आले. त्या अगोदर वर्षभरात २ ते ३ एवढेच. ऐनवेळीही काही व्यक्तींच्या कुटुंबीयांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला. पण संदर्भातील सर्व कागदोपत्री प्रक्रिया सहा तासांच्या आत पूर्ण झाली तरच घाटीकडून मृतदेह स्वीकारला जातो. सध्या कोणाही मृत व्यक्तींचे देहदान हे करोनाची चाचणी नकारात्मक असेल तरच स्वीकारले जातात.

– डॉ. प्रतिमा कुलकर्णी, घाटी.