रुग्णांचा शोध लवकर होत असल्याने येत्या काळात मृत्युसंख्या आणि दर कमी होईल असे सांगण्यात येत असताना शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सहा जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात करोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींची संख्या ४३२ असून घाटी रुग्णालयात ३२३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची संख्या कमी व्हावी म्हणून लागण झाल्या झाल्या उपचार घेणे अधिक हिताचे असे सांगण्यात येते. त्यामुळेच सुरू असणाऱ्या चाचण्यांचा वेगही वाढविण्यात येत आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता साडेबारा हजारांच्या वर गेली आहे. सध्या चार हजार ८२७ जणांवर उपचार सुरू आहेत.

दहा दिवसांची टाळेबंदी लावल्यामुळे मृत्यूचा दर कमी झाल्याचा दिसून आले. मात्र, वाढलेला रुग्णशोध हे त्यामागचे कारण आहे. दरम्यान, टाळेबंदीच्या काळात म्हणजे १० ते १८ जुलै या कालावधीमधील मृत्यूची संख्या आणि गेल्या महिन्यात याच कालावधीमधील संख्या लक्षात घेता मृत्युसंख्या २४ ने कमी झाल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. ग्रामीण भागातील तसेच शहराभोवतालचे अनेक गंभीर रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होत आहेत. दरम्यान, करोनाबाधितांची संख्या शुक्रवारीही वाढतीच राहिली. लक्षणे नसणारे किंवा सौम्य लक्षणे असणारे अनेक रुग्ण कोविड काळजी केंद्रात दाखल केले जात आहेत. खासगी रुग्णालयातून अशा रुग्णांना महापालिकेच्या करोना काळजी केंद्रातच पाठवावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

हिंगोलीत नवे ५४ रुग्ण

जिल्ह्यात करोना संदर्भात गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालावरून एकाच दिवसात ५४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये अँटिजन चाचण्यांच्या आधारे ५४ जण करोनाबाधित झाले आहेत. एकूण रुग्णसंख्येचा आकडा आता ५०६ वर पोहोचला आहे. यापैकी ३३४ रुग्ण बरे झाले असून १६७ रुग्ण दाखल आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळे पाच मृत्यू झाले आहेत.

नांदेडमध्ये बळींची संख्या ५४

नांदेड शहरातील गोवर्धन घाट येथील ६७ वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाला. आता नांदेडमधील करोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींची संख्या ५४ एवढी झाली आहे. सध्या ४५१ जणांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी ३९ रुग्णांची भर पडली.

लातूर जिल्हय़ात नव्याने ४४ करोनाबाधितांची भर

शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हय़ात नव्याने ४४ करोनाबाधितांची भर पडली. आरटीपीसीआर चाचणीतून ३२ जण तर अँटिजन चाचणीतून १२ जण करोनाबाधित असल्याचे आढळून आले. शुक्रवारी ५० जणांना करोनामुक्त म्हणून जाहीर करण्यात आले. जिल्हय़ात आतापर्यंत ११ हजार ३८३ जणांची करोनाची चाचणी झाली असून त्यापकी १० हजार ८६८ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत तर ४२७ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंतच्या करोनाबाधितांचा एकूण आकडा १ हजार ३९७ असून करोनामुक्त ७६१ आहेत.

जालन्यात करोनाचे ५८ बळी

जिल्ह्य़ात आणखी दोन रुग्ण मृत्युमुखी पडल्यामुळे आतापर्यंतच्या करोनाबळींची संख्या ५८ झाली आहे. शुक्रवारी दुपापर्यंत जिल्ह्य़ातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ हजार ६३४ झाली होती. यापैकी ९८५ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्य़ात विविध ठिकाणी सध्या संस्थात्मक अलगीकरणात आठशेपेक्षा अधिक व्यक्ती आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याबद्दल आतापर्यंत १ हजार २६ गुन्हे नोंद झाले आहेत.