सुहास सरदेशमुख

तापमान ४० अंशाच्या वर, सकाळच्या सत्रात रुग्णवाहिकांमधून मेणकापडात गुंडाळलेल्या अवस्थेत करोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह आणले जातात. कधी सकाळीच कामाला लागवे लागते तर कधी भर दुपारी. अग्नी द्याायला कोणी नसते. एखादा नातेवाईक हुंदका देतो. आपल्याशी दूरध्वनीवर कालपर्यंत बोलणारा रात्री कधी तरी देवाघरी गेला आणि त्याचे अंत्यसंस्कार होताहेत हेच मनाला न पटल्याने कोणी हमसून- हमसून रडतो. निरव शांततेत चिता जळत असतात. सरणासाठी लागणारे लाकडे आणि डिझेल दोन्हींचे भाव वाढलेले असल्याने मृत रुग्णांच्या नातेवाईकांना थोडी अधिकची रक्कम मागितली की कोणी तरी चिडते. पण आता हे काम खूप जास्त होत आहे. त्यामुळे हे मृत्यूचे तांडव थांबणार कधी, असा प्रश्न आम्हाला पडत असल्याचे पुष्पनगरी स्मशानभूमीमध्ये मसनजोगी म्हणून काम करणारे गोविंद गायकवाड सांगतात.

महापालिका एका मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी २५० रुपये देते. पण आता वाढणारे मृत्यू पाहणे आम्हालाही अवघड होत असल्याचे स्मशानजोगी सांगतात. गेली अनेक वर्षे ते स्मशानात मुले आणि सुनांसह पुष्पनगरी स्मशानात राहतात. औरंगाबाद आणि नांदेड शहरात सरासरी २७ ते ३० मृत्यू होतात. मराठवाड्यातील आठ जिह्य’ाात करोनामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या ६९०७ एवढी असून दररोज होणारे मृत्यू चिंताजनक आहेत. प्राणवायूची कमतरता, औषधे मिळण्यात येणाऱ्या अडचणी यामुळे समस्या वाढल्या आहेत. अशा काळात स्मशानभूमीतील दृश्य अधिक भीतीदायक आहेत. गेल्या काही दिवसात अंत्यसंस्कारासाठीही रुग्णांच्या नातेवाईकांना अधिक रक्कम मोजावी लागत आहे. गोविंद गायकवाड सांगत होेते, पूर्वी ५५० क्विंटल रुपयांपर्यंत मिळणारे सरणाचे लाकूड आता ७५० रुपयांपर्यंत गेले आहे. पण डिझेलचा दर अधिक वाढलेला असताना लाकडे वाहतूक करणारी व्यक्ती दुप्पटच रक्कम घेत आहे. पूर्वी ५५० रुपये लागायचे, वाहतुकीला आता १२०० रुपये लागतात. त्यामुळे स्मशानातही अधिक पैसे लावले जातात असे रुग्णांच्या नातेवाईकांना वाटत आहे. करोना रुग्णांचे अंत्यसंस्कार वेष्टनात करावे लागत असल्याने एरवीपेक्षा अधिक डिझेलचा वापरही करावा लागत असल्याचे स्मशानजोगी सांगतात. कैलाशनगर स्मशानभूमीतील साहेबराव गायकवाड यांना मंगळवारी बोलता येईल एवढाही वेळ नव्हता. मृतदेह घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या वाढत होती, त्यामुळे साहेबरावच्या कामाचे तास वाढत होते. हे काम वाढल्याचा त्यांना त्रासच अधिक होता.

महापालिकेने मृत करोना व्यक्तीला स्मशानभूमीत पोहचविण्याचे काम एका बचत गटाला दिले आहे. सध्या मृत्यूची संख्या अधिक असल्याने मृतदेह नेण्यासाठी विलंब होत असल्याचे दिसून आले आहे. मृतदेहावर किमान लवकर अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी नातेवाईक प्रयत्न करत असतात. हा सगळा संवाद दूरध्वनीवर होतो. एखादा नातेवाईक स्मशानभूमीपर्यंत येतो. पण ही प्रक्रिया होण्यासाठी लागणारा कालावधी अधिक असल्याने अंत्यसंस्कारातील अडचणी वाढल्या आहेत. मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी आणखी एखाद्या एजन्सीला काम देता येईल काय, याची चाचपणी केली जात आहे.

राख टाकण्यालाही विरोध

औरंगाबाद शहरात करोनाव्यतिरिक्त होणारे मृत्यू आणि ती रक्षा कायगाव टोका येथे गोदावरी नदीच्या घाटावर टाकण्यासाठी नेली जाते. पण आता राख टाकण्यास विरोध केला जात आहे. रक्षा एका पोत्यात ठेवा, बाकी कपडे आणि अन्य साहित्य नदीच्या पाण्यात टाकू नका, असे आवाहन केले जात आहे. ते बरोबरही आहे. पण रक्षा विसर्जनास विरोध केला जाऊ नये असे आवाहन केले जात आहे.