औरंगाबाद : ब्रिटनहून आलेल्या नागरिकांचे शहरात सर्वेक्षण सुरू असून आतापर्यंत ४४ जण दाखल झालेले आहेत. त्यातील एका महिलेने गुरुवारी करोना चाचणी केली असता तिचा अहवाल सकारात्मक आला आहे. या महिलेच्या स्रावाचा नमुना पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी दिली.

ब्रिटनमध्ये नवीन करोना विषाणूचा प्रकार समोर आला त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी महिनाभरात ब्रिटन येथून आलेल्या नागरिकांची सक्तीने करोना चाचणी करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी प्रशासक तथा आयुक्त सुनील चव्हाण यांच्या आदेशावरुन महापालिकेने २५ नोव्हेंबरनंतर ब्रिटन येथून शहरात आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या प्रवाशांची यादी ४४ वर गेली आहे.

२५ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान शहरात ४४ नागरिक ब्रिटन येथून आले आहे. त्यापैकी ७ जणांची आरटीपीसीआर पध्दतीने करोना चाचणी केली असून सर्वांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. तसेच यातील काहीजण परतही गेले असून काही बाहेरच्या जिल्ह्य़ातील आहेत. शहरात आलेल्या नागरिकांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क केला जात आहे. असेही डॉ. पाडळकर यांनी सांगितले.