|| सुहास सरदेशमुख

मृतदेहांचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘त्या’ २२ तरुणांचे कामाचे तास संपता संपत नाहीत!

औरंगाबाद : त्याच्या चेहऱ्यावर आता भीती दिसत नाही. शवागारातील मृतदेह पाहिल्यानंतरही तो काही काळ स्थिर असतो. एरवी त्याला दिवसभरात फारसे काम नव्हते. दोन किंवा तीन मृतदेहांची विल्हेवाट लावावी लागायची. आता त्याला १२ तास, कधी १८ तासांपर्यंत काम करावे लागत आहे.

मी हे काम केले नाही तर माझ्या घरात कोणालाच खायला मिळणार नाही आणि आता तर वेळच अशी आली आहे की, माणुसकी म्हणूनसुद्धा मृतदेह बांधण्याचे काम करावेच लागणार आहे, विक्रम बनसोडे याने हतबलपणे सांगितले. सरणापर्यंतची दमछाक मन विषण्ण करणारी आहे.

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर संसर्ग पसरू नये म्हणून शवागारातच मृतदेहाला प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळले जाते. प्लास्टिकच्या पिशवीत भरून मृतदेह अंत्यसंस्काराला पाठवेपर्यंतचे काम २२ जणांचा चमू करतो. शासकीय प्रक्रियेतून मिळणारी रक्कम याच चमूतील व्यक्तींना मिळत राहते. पण या २०-२२ जणांचे काम आता दिवसभरातही संपत नाही. विक्रम बनसोडेने सांगितले की, माझ्या घरात आई-वडील, मुले, पत्नी या सर्वांना मी जे काम करतो, त्याची माहिती आहे. आई-वडिलांच्या संपर्कात न येण्याची दक्षता घेतो. सुरुवातीचे काही दिवस मनात खूप भीती होती. आता ती वाटत नाही. पण मृत्यूचे तांडवही पाहवत नाही.

सोमवारी घाटी रुग्णालयात ४० जणांचा मृत्यू झाला. या चमूतले बहुतांश जण दिवसभर मृतदेह बांधण्याच्या कामात व्यग्र होते. रुग्ण कक्षातून मृतदेह शवागारापर्यंत पीपीपीई किट घालून आणणे, त्याच्याभोवती कापड गुंडाळणे. त्यानंतर तो प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरणे अशी कामाची विभागणी केली जाते.

‘एखादा मृतदेह जास्त वजनाचा असतो तेव्हा चारपेक्षा जास्त जणांना काम करावे लागते. बऱ्याचदा काहीजण सुट्या घेतात. घरातल्या अडचणींमुळे येऊ शकत नाही. तेव्हा रुग्णवाहिकेच्या चालकांना आणि मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या बचत गटातील सदस्यांना बरोबर घेऊन हे काम करावे लागते, असे या प्रक्रियेत प्रमुख म्हणून काम करणाऱ्या किरण रावल यांनी सांगितले.

सचिन कोटकर, शेख इरफान यांच्यासह एकमेकांचे मित्र असणारे २०-२२ जण २४ तासांत दोन-तीन सत्रांमध्ये मृतदेहांची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी कार्यरत आहेत. ज्यांच्या घरी खाण्या-पिण्याचेच वांदे असतात असे तरुणच हे काम करायला पुढे येतात. आता मृतदेहांचा आकडा वाढतो आहे. कधी-कधी दिवसभर काम करावे लागते. वाईट आहे हे सगळे. पण केले नाही तर घर चालणार नाही, अशी अगतिकता काहीजण व्यक्त करतात.

दफ्तरे बनवणाऱ्या हातांना मृतदेहांच्या पिशव्यांचे काम

गेल्या वर्षीच्या टाळेबंदीनंतर शाळा सुरू न झाल्याने दप्तरनिर्मितीच्या क्षेत्रातील व्यावसायिक अडचणीत आले. कामगारांना बसवून ठेवण्याऐवजी त्यातील काहींनी मृतदेहाला गुंडाळण्यासाठी पिशव्या तयार करण्याचे काम हाती घेतले. मृत्यूचे तांडव सुरू असल्यामुळे या पिशव्यांचा वापर वाढला आहे, हे खरे. पण या पिशव्या तयार करताना मनात दु:खच आहे, असे व्यावसायिक सांगतात. करोनामुळे मृत्यू तांडव सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात टाळेबंदी लागली होती. शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा दप्तर तयार करण्याचा व्यवसाय पूर्णत: थांबला होता. कामगार बसून होते. त्यांच्या हाताला काम देता यावे म्हणून मृतदेहांसाठी पिशव्या बनविणारे व्यावसायिक प्रिंसेस चोरडिया म्हणाले, ‘‘व्यवसायात माझ्याबरोबर काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्न अधिक गंभीर होते. शिलाई करणारे आणि दप्तर बनविणाऱ्या या कामगारांना काम काय द्यावे, असा प्रश्न होता. मृतदेहासाठी पिशव्या बनविताना मनात दु:ख असते, त्यावर पण अवलंबून असणाऱ्या कामगारांना काही ना काही काम देता आले.’’ खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळल्याशिवाय त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाऊ नयेत, असा करोना प्रतिबंधक नियम आहे. त्यामुळे खासगी आणि शासकीय रुग्णालयात दीडशे ते तीनशे रुपयांपर्यंतच्या प्लास्टिकच्या पिशव्या खरेदी केल्या जातात. पीपीई किट, हातमोजे, एन-९५ मास्क याबरोबरच या पिशव्यांची खरेदी होते. गत्यंतर नसणाऱ्या अनेकांनी व्यवसाय बदलले आहेत. वह््या-पुस्तके आणि साहित्य विक्रीतील अनेकांनी गरजेच्या व्यवसायाची निवड केली आहे. त्यात तेलाचे घाणे, तयार पीठ, किराणा आणि भाजी विक्रीत अनेकजण उतरले आहेत.  दुसऱ्या लाटेत निर्बंध घातल्यानंतर पुणे-मुंबईतील काही कामगार पुन्हा गावी निघून गेल्यामुळे काही मोठ्या शहरांतूनही मृतदेहासाठी पिशव्या बनविण्याचे काम औरंगाबादसारख्या शहरात होत आहे. यासाठी लागणारा कच्चा माल मुंबईहून आणला जातो. तसेच औरंगाबाद शहरातही ‘ग्रॅन्युल्स’पासून प्लास्टिक कागद बनविणाऱ्या कंपन्या आहेत.