औरंगाबादेत उद्या मध्यरात्रीपासून टाळेबंदी

औरंगाबाद : औरंगाबाद शहर व जिल्ह्यात मिळून शनिवारी सलग पाचव्या दिवशी दीड हजारांवर करोना रुग्ण आढळले. वाढती रुग्ण संख्येची साखळी तोडण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाने ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून टाळेबंदी लागू केली आहे.

करोनाचा प्रादूर्भाव पाहता होळी व धुळवड सणाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. २३ मार्च रोजी जिल्ह्यात एक हजार ७९१ रुग्ण आढळून आले होते. दुसऱ्या दिवशीही सतराशे दोन, २५ मार्च रोजी एक हजार ५९५ तर २६ मार्च रोजी पुन्हा सतराशे ८७ रुग्ण निघाले.  २७ मार्च रोजीही सतराशे १५ रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन हादरले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण १५ हजार ५६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ५५९ रुग्णांचा मृत्यू  तर ७७ हजार ३५० एकूण रुग्णांपैकी ६० हजार २२८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

टाळेबंदीविरोधात मोर्चा काढू – खासदार जलील

औरंगाबाद जिल्ह्यात ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून टाळेबंदी लागू करण्याच्या निर्णयावरून खासदार इम्तियाज जलील हे आक्रमक झाले असून टाळेबंदीला विरोध दर्शवण्यासाठी ३१ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची भूमिका त्यांनी   रविवारी  पत्रकार परिषदेत मांडली.  वर्षभरापासून सरकारसह जिल्हा प्रशासनाला करोनाचा संसर्ग आटोक्यात आणता आला नाही.  आता पुन्हा  टाळेबंदी लागू करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील विविध शासकीय रूग्णालयात जवळपास २ हजार ४८ पदे रिक्त असून ती तात्काळ भरावी, अशी मागणीही त्यांनी केली.

चार मोठे कोविड सेंटर

औरंगाबाद शहरात मोठी आणि अद्ययावत यंत्रणा असलेले चार कोविड सेंटर उभारण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत. विभागीय क्रीडा संकुलाच्या ठिकाणी शनिवारी मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी पाहणी करून आढावा घेतला.  यापूर्वीच ३१ मंगल कार्यालये ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून तेथेही  कोविड सेंटर सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत.