|| बिपीन देशपांडे

ग्रामीण भागातील विदारक वास्तव समोर

औरंगाबाद : करोनाच्या पार्श्वभूमवर दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा गुरुवारपासून गजबजल्या खऱ्या; पण एका सामाजिक विदारक चित्रासह. ग्रामीण भागातील बऱ्याच मुलींचा बालविवाह या दीड वर्षांच्या काळात उरकण्यात आलेला असून विवाहित मुलींनी गुरुवारी मंगळसूत्रासह शाळेत प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६२० शाळांमध्ये दीड वर्षांनंतर घंटा वाजली. शाळेचा पहिला दिवस म्हणून विद्यार्थ्यांची उपस्थिती, त्यांचा उत्साह आणि करोनाच्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक शाळांना भेटी देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यानच दहावीतील सुमारे १५ ते २० मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र दिसून आले. काही मुलींनी ते लपवले. तर काहींनी ते लपवण्याचा प्रयत्न करतानाच्या हालचाली शिक्षकांच्या नजरेत आल्या.

आपल्याकडे कायदे अनेक आहेत, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. अंमलबजावणीचे व्यवस्थापन होत नाही. त्यावर काम होत नाही. बालविवाह प्रतिबंधक कायदा असला, तरी त्यासाठी नेमकेपणाने काम होत नाही. ग्रामीण स्तरावर अनेक समित्या आहेत. सरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष, पोलीसपाटील, पोलीस, तलाठी असे सर्व असताना बालविवाह होतो कसा, हा मोठा प्रश्न आहे.  – रेणुका कड, कार्यक्रम संशोधक समन्वयक, विकास अध्ययन केंद्र,

 

२८ जिल्ह्यांतील शाळा सुरू

पुणे : राज्यात गुरुवारी २८ जिल्ह्यांतील ५ हजार ९४७ शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी ४ लाख १६ हजार ५९९ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ९४० शाळा सुरू झाल्या आहेत. त्या खालोखाल औरंगाबाद जिल्ह्यात ६३१, यवतमाळ जिल्ह्यात ५०२, जालना जिल्ह्यात ४४७, अकोला जिल्ह्यात ३२१, जळगाव जिल्ह्यात ३०६ शाळा सुरू झाल्या.

गुपचूप सोहळे…

ग्रामीण भाग अथवा शहरांतील गरीब वस्त्यांमध्ये ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइलची व्यवस्था केली जात असली, तरी त्यावरच्या नेटपॅकचा खर्चही अनेकांना झेपत नाही.

कुठलीही महासाथ, सामाजिक संकटाचा थेट परिणाम हा कुटुंबातील महिला, मुलींवरच होताना दिसतो. मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात बालविवाहाची समस्या आहेच.

काही प्रमाणात बालविवाह रोखले गेले असले, तरी वधु-वर पक्षाच्या संगनमताने गुपचूप विवाह होत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

विवाहित विद्यार्थिनी म्हणतात…  वयात आलेली मुलगी, करोनाच्या काळात तिचे घरी असणे आणि लग्नासारख्या होणाऱ्या सोहळ्यांच्या आयोजनावर आलेल्या मर्यादांमुळे खर्चाची बचत होण्याच्या विचारापायी पालकांनी १५-१६ वर्षातच मुलींची लग्ने उरकली, असे त्यांच्याशी बोलल्यानंतर समजले.