२१ नखी कासव आणि ‘लॅब्रेडॉर’चीही मागणी

औरंगाबाद: करोनाकाळात विवाहाचा डामडौल तसा संपला आणि हुंड्याची सरासरी किंमत आठ-दहा लाख रुपयांपर्यंत तर पोहोचलीच पण आता नवरीला नोकरीला लावण्यासाठी दहा लाख रुपये आणि २१ नखी कासव आणि ‘लॅब्रेडॉर’ जातीचा कुत्रा हुंड्यात मागितल्याने विवाह मोडल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. २१ नखी कासवाची अंदाजे किंमत लाख रुपयांपर्यंत असते तर लब्रोडॉग जातीच्या कुत्र्याचे पिल्लू  ७० हजार रुपयांपर्यंत असते. विवाह ठरविताना हुंडा मागितल्या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पण हुंड्यात मागितलेले कासव श्रीमंती देणारे असल्याची अंधश्रद्धा बळावत असल्याचे दिसून येत आहे.

औरंगाबाद येथील रमानगर भागात राहणारे आणि वीटभट्टीचा व्यवसाय करणारे अनिल सदाशिवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  आरोपी रवींद्र चराटे, लता चराटे, अकाश चराटे, पूनम चराटे, माधुरी चराटे व बाळापूर येथील अकोला येथील संतोष उगले यांनी मुलीसोबत विवाह ठरवून साखरपुड्याच्या वेळी हुंड्यापोटी दोन लाख ११ हजार रुपये घेतले. नवरीला नोकरी लावण्यासाठी आणखी दहा लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केली. त्याच बरोबर २१ नखी कासव आणि लॅब्राडॉग कुत्राही हुंडा म्हणून मागितला.

 

कासव पाळणारे वाढले

शहरी भागातील काही श्रीमंतांच्या घरी तळहाताच्या आकाराचे कासव पाळणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. खरे तर कासव हा पाळीव प्राणी नाही. नर-मादी पैकी एकच कासव सर्वसाधारणपणे घरात आणले जाते. त्याला जोडीदार नसतो. त्यामुळे तो प्राणी तसा मलूल पडून राहतो. त्याला खाण्यासाठी काय द्यावे याचेही प्रश्न असतात. पण लोक कासव पाळू लागले आहेत. हा प्रकार अलिकडे वाढला आहे. कासव पाळणाऱ्यांपैकी एकाने संपर्क करून ते उत्साही ठेवण्यासाठी काय करावे असा सल्लाही विचारला होता, अशी माहिती पक्षी आणि जलचर क्षेत्राचे अभ्यासक दिलीप यार्दी यांनी दिली.

लोक शिकल्यानंतर शहाणी होतात असे नाही. हुंड्यात अशा प्रकारे कासव मागणे हे तर किळसवाणे आहे. पण करोनाकाळात हुंड्याचे प्रमाण वाढले आहे. सोन्यास्वरूपात हुंडा अधिक घेतला जात आहे. आता अशी अंधश्रद्ध मागणी तर विवाह पद्धती किती घसरणीला लागली आहे, याचे दर्शक आहे. काही मुली हुंडा देण्यास विरोध करतात, तेव्हा त्यांना प्रोत्साहन देणारी यंत्रणा वाढायला हवी.  – मंगल खिवंसरा,  सामाजिक कार्यकतर्त्यां