बजाज ऑटोच्या औरंगाबादमधील प्लांटमध्ये २५० कर्मचारी करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यानंतर युनिअनकडून तात्पुरता प्लांट बंद करण्याची मागणी केली जात आहे. कंपनीच्या युनिअनकडून ही माहिती रॉयर्टसला देण्यात आली आहे. लॉकडाउनच्या काळात एकीकडे पुन्हा एकदा वेगाने काम सुरु करण्याची तयारी असतानाच ही मागणी करण्यात आली आहे.

भारतात मार्च महिन्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. अद्यापही करोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र अर्थचक्र रुळावर आणण्यासाठी अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. पण अशा परिस्थितीत अनेक कंपन्यांसमोर कठीण परिस्थतीत काम सुरु करण्याचं आव्हान आहे.

पश्चिम महाराष्ट्रात बजाज ऑटो फॅक्टरी असून या क्षेत्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात जे कर्मचारी कामावर येणार नाहीत त्यांना पगार दिला जाणार नाही असं सांगितलं आहे. “कर्मचारी कामावर येण्यास घाबरत आहेत. काही जण येत आहेत तर काहींनी सुट्टी घेतली आहे,” अशी माहिती बजाज ऑटो वर्कर्स युनिअनचे अध्यक्ष थेंगडे बाजीराव यांनी दिली आहे.

२६ जून रोजी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फॅक्टरीमधील आठ हजार कर्मचाऱ्यांपैकी १४० जणांना करोनाची लागण झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कंपनीने काम थांबवू शकत नसून, व्हायरससोबत जगायला शिकलं पाहिजे असं म्हटलं आहे. औरंगाबादमधील वाळूज येतील प्लांटमधील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, करोना रुग्णांचा आकडा सध्या २५० वर गेला आहे. बजाजकडून मात्र अद्याप यावर कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

“आम्ही कंपनीकडे करोनाची साखळी तोडण्यासाठी १० ते १५ दिवसांसाठी प्लांट बंद ठेवण्याची विनंती केली. पण त्यांनी यामुळे कोणताही फायदा होणार असून काम संपपल्यानंतर लोक असंही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र येतात असं उत्तर दिलं,” अशी माहिती बाजीराव यांनी दिली आहे.

बजाजच्या भारतामधील एकूण प्रोडक्शनपैकी ५० टक्के प्रोडक्शन वळूज प्लांटमध्ये होतं. वळूज प्लांटमध्ये दरवर्षी ३० लाख ३० हजार मोटर बाइक आणि इतर वाहनांची निर्मिती होते. बजाज कंपनी कामगारांसाठी सुरक्षेचे सर्व नियम पाळत आहे. मात्र ते पुरेसं नसल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. असेम्बली लाइनवर अनेक लोक एकाच इंजिनला हात लावतात. आम्ही ग्लोव्ह्ज वापरत असलो तरी त्यामुळे संसर्ग होणार नाही याची शक्यता फार कमी आहे असं रुग्णालयात दाखल एका कर्मचाऱ्यांने सांगितलं आहे.