खाटा रिकाम्या राहण्याने सकारात्मक संदेश

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून शहरातील करोना रुग्णसंख्या घसरणीला लागली आहे. सरासरी १३० ते १५० करोना रुग्ण दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसात प्राणवायू सुविधांसह खाटांची संख्या एक हजारापेक्षा अधिक वाढविल्याने रुग्णालयातील खाटा रिकाम्या राहू लागल्या आहेत, ही चांगली बाब आहे. लवकर निदान होत असल्याने मृत्यूही नियंत्रणात येत असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पाडाळकर यांनी केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातही आता खाटा रिक्त दिसून येत आहेत. अतिदक्षता विभागातील ऑक्सीजन सुविधा असणाऱ्या खाटांवर २८ जण असून तीन जण व्हेटिंलेटर आहेत. शहरातील विविध रुग्णालयातील व्हेंटिलेटर असणाऱ्या रुग्णांची संख्या ६१ एवढी आहे.  सध्या विविध रुग्णालयात १९८४ जणांवर उपचार सुरू आहेत.

महापालिकेतील कोविड काळजी केंद्रात ७०० जणांवर उपचार सुरू आहेत. अलगीकरण कक्षात एक हजार ३२४ जण अलगीकरण कक्षात आहेत. प्राणवायू लागणाऱ्या रुग्णांची संख्या २९३ एवढी असून अतिदक्षता विभागातील ऑक्सीजन खाटांवर १३९ जण उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून औषधोपचारात झालेले बदल आणि रेमडेसिविरसारख्या इंजेक्शनचा योग्य वेळी वापर यामुळे मृत्युसंख्येवर नियंत्रण मिळत आहे. तसेच प्रसारही कमी होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी खाटा रिक्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. जे साथरोगासाठी चांगले संकेत आहेत.