News Flash

उधार उसनवारीवर प्राणवायू ; ग्रामीण भागातील संसर्ग वाढला

लक्षणे नसणाऱ्या व्यक्ती गावात फिरत राहतात. परिणामी संसर्ग वाढत आहे.

औरंगाबाद : प्राणवायूची उधार उसनवारी, रेमडेसिविरसाठी सुरू असणारी वणवण यामध्ये मराठवाडय़ातील ग्रामीण भागात करोना संसर्गाची व्याप्ती वाढू लागली आहे. गावागावातून करण्यात आलेल्या चाचणीचे अहवाल शहरांमध्ये पोहोचून व्यक्ती करोनाबाधित आहे की नाही हे कळायला ३६ ते ४८ तासही लागतात. दरम्यान लक्षणे नसणाऱ्या व्यक्ती गावात फिरत राहतात. परिणामी संसर्ग वाढत आहे. त्यामुळे आता चाचणी घेतल्यानंतर ती व्यक्ती बाहेर फिरणार नाही व अहवाल सकारात्मक आल्यानंतर तो रुग्ण उपचारार्थ दाखल  होईपर्यंत त्याच्या हातावर ‘ होम क्वारंटाइन’ असा शिक्का मारला जाण्याची कारवाई केली जाणार आहे. औरंगाबाद शहरातील रुग्णांचे अहवाल चाचणी पूर्ण होता क्षणी भ्रमणध्वनीवर कळविले जातात. ग्रामीण भागात ती सुविधा नाही. त्यामुळे चाचणी अहवाल तयार होण्यास लागणारा विलंब आणि तो कळविण्यास लागणारा विलंब कमी करण्यावर आता औरंगाबाद जिल्हा परिषदेने लक्ष केंद्रित केले आहे.

मराठवाडय़ातील औरंगाबाद, परभणी, लातूर, नांदेड, या चार महापालिका क्षेत्रांत बुधवारची रुग्णसंख्या १७६९ होती तर ग्रामीण भागातील संसर्गसंख्या पाच हजार ४५ एवढी होती.  ग्रामीण भागातील संसर्ग कमी करण्यासाठी चाचणी अहवालाचा वेळ कमी करणे हे प्रशासनासमोर आव्हान बनू लागले आहे. दिवसभरातील चाचणीचे नमुने तपासणीसाठी पाच वाजता शहराकडे पाठविले जातात. ते प्रयोगशाळेपर्यंत पोहोचून त्याचा अहवाल तयार करण्यासाठी आणि तो कळविण्यासाठी  अनेकदा ३६ तासही लागतात. या कालावधीत संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसून आले आहे.  गेल्या आठवडय़ापासून वाढत जाणारे मृत्यूही चिंतेची बाब ठरू लागली आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजता राज्य सरकारला कळविलेल्या अहवालानुसार १५१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू औरंगाबादमध्ये झाले होते. अंगावर दुखणे काढण्याच्या वृत्तीमुळेही अडचणी वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राणवायूचा पुरवठा जेमतेमच

मराठवाडय़ातील प्राणवायूचा पुरवठा जेमतेमच असल्याचे दिसून आले आहे. औरंगाबाद शहरासाठी ६७ केएल प्राणवायू आवश्यक आहे. पण बुधवारपासून प्राणवायूचे लेखापरीक्षण सुरू करण्यात आले असून आवश्यतेनुसार रुग्णास प्राणवायू मिळतो आहे काय? याची तपासणी केली जात आहे. दरम्यान प्राणवायू व्यवस्थापन करताना येणाऱ्या सर्व अडचणी दूर केल्या जात असल्याचे हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले. केवळ प्राणवायूच नाही तर खासगी रुग्णालयातील देयकांची तपासणी केली जात आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी खासगी रुग्णालयांसाठी प्रत्येकी दोन लेखापरीक्षक नेमले असून कोणी अधिक देयक तर आकारत नाही ना, याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 12:38 am

Web Title: coronavirus infection increased in marathwada rural areas zws 70
Next Stories
1 अर्ध्यावरती आले सारे!
2 एका श्वासाचे अंतर ५५० किलोमीटर
3 औरंगाबादमध्ये प्राणवायू गळतीचे लेखापरीक्षण सुरू
Just Now!
X