संचारबंदी शिथिलतेच्या वेळेत दुचाकी गाड्या घेऊन रस्त्यावर फेरफटका मारायला आलेल्या तब्बल साडेचारशे गाड्या पोलिसांनी जप्त केल्या. करोनाची महामारी आलेली असताना लोकांची ही वृत्ती मग सुधारणार कधी ? असाच प्रश्न अवघ्या दोन तासात जप्त करण्यात आलेल्या गाड्यानंतर पोलीस यंत्रणा विचारत आहे.

बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू असून, शहरात एक दिवसाआड अडीच तास संचारबंदी शिथिल केली जाते. या काळात जनतेनं आपल्या जवळच्या भागातून भाजीपाला, किराणा खरेदी करावा असे अपेक्षित आहे. मात्र लोकांनी गाड्या घेऊन रस्त्यावर गर्दी केली. परिणामी प्रशासनानं इधनं वाटप बंद केलं. तरिही शिथिलतेच्या काळात गाड्यांची गर्दी कमी होईना. त्यामुळे गाड्यानां पेट्रोल कुठून मिळते असा प्रश्न समोर उभा राहिला आहे.

चारचाकी जप्तीचे आदेश देण्यात आल्यानंतर, दूचाकींची गर्दी वाढली. त्यामुळे सोमवारी १३ एप्रिल रोजी सकाळी सात ते साडेनऊ या अडीच तासात शहरातील अण्णाभाऊ साठे चौक, बशीरगंज, सुभाष रोड, माळीवेस, कारंजा पेठ. शिवाजी चौक या भागात पोलिसांनी विनाकारण फेरफटका मारायला आलेले तब्बल साडेचारशे दुचाकी जप्त केल्या आहेत. यात काही भाजीपाला फळे व इतर आवश्यक लोकांनाही काही प्रमाणात फटका बसला. मात्र करोना महामारीत ही लोक गंभीर नसल्याने, हे सुधारणार कधी असाच प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.