औरंगाबादमध्ये करोनामुळे परिस्थिती गंभीर होत असून शहरात १० ते १८ जुलै दरम्यान पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. सर्वसामान्यांमध्ये भीती असताना करोनामुळे दोन दिवसात शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून शिवसेना कार्यकर्ते शोक व्यक्त करत आहेत. नितीन साळवे आणि रावसाहेब आम्ले अशी या नगरसेवकांची नावं आहेत.

शिवसेनेचे उत्तम नगर बौद्धनगर वॉर्डाचे माजी नगरसेवक नितीन साळवी यांचं मंगळवारी निधन झालं. करोनाची लागण झाल्याने नितीन साळवे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. २६ जून रोजी एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. पण मंगळवारी उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं.  तर दुसरीकडे शिवसेनेचे पडेगावचे माजी नगरसेवक रावसाहेब आम्ले यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता. घाटी रुग्णालयातून त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यांना प्लाझ्मा थेरपी दिली जाणार होती. पण त्यापूर्वीच बुधवारी सकाळी त्यांचं निधन झालं. शिवसेना नगरसेवकांच्या निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णसंख्येची ८ हजाराकडे वाटचाल
बुधवारी सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात १६६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ७ हजार ३०० वर पोहचली आहे. बुधवारी आढळलेल्या १६६ रुग्णांमध्ये औरंगाबाद शहरातील ९९ व ग्रामीण भागातील ६७ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ९२ पुरुष व ७४ महिला रुग्ण आहेत. आतापर्यंत ३ हजार ८२४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर, ३ हजार १४९ रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळे ३२७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तपासणी करण्यात आलेल्या १ हजार ३ स्वॅबपैकी आज १६६ रुग्णांचा करोना तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात १० ते १८ जुलै दरम्यान पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाउनदरम्यान वाळूज येथील सर्व उद्योगही बंद ठेवले जणार आहेत. या बंददरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवेबाबतचे सर्व निर्णय पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त स्वतंत्रपणे जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली आहे. विभागीय आयुक्तांसमवेत लोकप्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.