स्वच्छ भारत घडवण्यासाठी हागणदारी मुक्तीची मोहीम देशातील मोठ्या शहरासह गाव खेड्यातही राबवली जात आहे. त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून औरंगाबादमध्ये गुडमॉर्निंग पथक कार्यरत आहे. या पथकाकडून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन फोटो काढला जातो. शहरात वेगवेगळ्या पद्धतीनं जनजागृती सुरु असताना औरंगाबादमधील भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड यांनी त्यांच्या वॉर्डातील दीड हजार नागरिकांना ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ हा चित्रपट मोफत दाखवला.

घरामध्ये शौचालय बांधणं आजही अनेक जणांना अशुभ वाटतं. अनेक जण शौचालय बांधून त्याचा वापर करत नाहीत. यात महिलांची मोठी कुचंबना होते. या सर्व गोष्टींवर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटात रेल्वेतील टॉयलेटचा कशाप्रकारे वापर करण्यात येतो हे देखील दाखवण्यात आले आहे. वार्डातील नागरिकांना चित्रपट दाखवण्याच्या कल्पनेबद्दल राठोड म्हणाले की,  ‘शौचालयाच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जागृती व्हावी. तसेच रेल्वे रुळावर, नाल्यात लोकांनी शौचास जाऊ नये, हा संदेश चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहचू शकतो. त्यामुळेच वॉर्डातील नागरिकांसाठी चित्रपटाचा शो बुक केला.’ या कल्पनेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे चित्रपटाच्या मध्यंतरामध्ये त्यांनी शौचालय वापरा, असे आवाहन देखील नागरिकांना केलं.

चित्रपट पाहण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. चित्रपटातील अक्षय कुमारच्या पत्नीने ज्या पद्धतीनं शौचालयासाठी लढा उभारला त्या पद्धतीनं प्रत्येक स्त्रीने आग्रह धरायला हवा, असे मत महिलांनी चित्रपटगृहातून बाहेर आल्यानंतर व्यक्त केलं. तर पुरुषांनीही शौचालय उभारण्याला प्राधान्य देईल, असे सांगत उघड्यावर शौचास जाणार नाही. तसेच जास्तीत जास्त शौचालयाचा वापर करण्याचं आश्वासन दिलं.