18 October 2018

News Flash

कापसावर ‘भाजप अळी’, अब्दुल सत्तार यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

मराठवाड्यात आंदोलन छेडणार

बोंड अळीचं नियोजन करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले, असा आरोप सत्तार यांनी केला आहे. (प्रातिनिधीक छायाचित्र)

काँग्रेसच्या काळात पिकांवर कीड येत होती. त्यावेळी योग्य उपाय योजना करण्यात आल्या. मात्र, सध्यस्थितीला कापसावर पडलेल्या बोंड अळीचं नियोजन करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. कापसावर पडलेली अळी म्हणजे ‘भाजपअळी’ आहे. गुलाबी किडा दिसत नाही. मात्र, कापूस खाऊन घेतो. भाजप सरकारचा कारभार देखील असाच आहे, अशी टीका काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी केली. औरंगाबाद येथील सुभेदारी विश्राम येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बोंड अळीमुळे शेतकरी हैराण असताना कृषीमंत्री कुठेही दिसत नाहीत. ते महाराष्ट्राचे कृषीमंत्री नाहीत तर ‘खामगावचे’ कृषीमंत्री आहेत. कृषीमंत्री दाखवा आणि काँग्रेसकडून पंचवीस हजार मिळवा, अशी घोषणा सत्तार यांनी यावेळी केली.

बोगस बियाणांमुळे कापसावर बोंड अळी पडली असून, त्याला कंपन्या जबाबदार आहेत. त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसकडून ठिय्या आंदोलन करण्यात आल्यानंतर चार कंपन्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मराठवाड्यात आंदोलन छेडणार असल्याचे संकेत सत्तार यांनी दिले आहेत. कंपन्यांवर गुन्हे दाखल करताना शेतकऱ्याला ५० हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली असून, नुकसान भरपाई दिली नाही, तर अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

First Published on December 1, 2017 5:50 pm

Web Title: cotton cultivation issue congress leaders abdul sattar target on bjp govrnment