|| सुहास सरदेशमुख

अतिवृष्टीमुळे कापूस पिकांचे झालेले नुकसान दाखविताना सरकारी यंत्रणांनी आणि राजकीय नेत्यांनी राईचा पर्वत केला असावा अशी शंका निर्माण करणारी आकडेवारी भारतीय कापूस महामंडळाच्या कापूस खरेदीतून पुढे येऊ लागली आहे. या वर्षी साधारणत: ८५ लाख गाठी कापूस खरेदी होईल. त्याचा दर्जाची चांगला असल्याची माहिती कापूस महामंडळाचे अधिकारी एस. के. दास यांनी दिली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला केवळ ६५ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली होती. या वर्षीच्या खरेदीचा आकडा साडेतीन लाख क्विंटलापर्यंत पोहचला आहे. नव्या आकडेवारीमुळे केंद्र सरकारकडे आपत्ती निवारणार्थ आर्थिक मदतीसाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

मराठवाडा आणि खान्देशातील जिल्ह्यामध्ये भारतीय कापूस महामंडळाकडून दहा जिल्हय़ात ४४ खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामध्ये पहिले काही दिवस काळा किंवा पिवळसर रंगाचा कापूस आला. पण आता दर्जेदार कापूस येत असून या वर्षी खरेदी प्रक्रियाही अधिक वेगाने सुरू असल्याचा दावा भारतीय कापूस महामंडळाचे अधिकारी करीत आहेत. गेल्या दोन वर्षांत सतत दुष्काळाची स्थिती असल्याने कापसाचा दर्जा आणि उत्पादन दोन्हीही कमी होते. मात्र, या वर्षी तशी स्थिती नाही. मराठवाडा आणि खान्देशामध्ये एच-४ किंवा एच-६ जातीच्या कापसाची विक्री होते. या वर्षी कापसाला पाच हजार ५५० रुपये हमी भाव असल्याने बहुतांश कापूस भारतीय कापूस महामंडळाच्या खरेदी केंद्रावरच विक्रीला आणला जात आहे. २७.५ ते २८.५ सूतलांबी असलेल्या कापसाला पाच हजार ३५० एवढा भाव दिला जातो. ही खरेदी आता वाढू लागली आहे. गेल्या चार वर्षांतील खरेदीचे प्रमाण या वर्षी सर्वाधिक असल्याचा दावा अधिकारी करीत आहेत. यामुळे अतिवृष्टीतील पंचनामे ढोबळपणे केले गेले का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठवाडय़ाता ऑक्टोबरमध्ये आलेल्या पावसामुळे मका, ज्वारी, बाजरी यासह मोठय़ाप्रमाणात कापूस आणि सोयाबीनचे नुकसान झाल्याची आकडेवारी महसूल प्रशासनाने दिली. सरकार स्थापन होण्यापूर्वी नुकसानीची पाहणी करण्यासाठी बहुतांश नेत्यांनी दौरे केले. बाकी पिकांचे नुकसान दिसत होते. पण कापसावर लाल्या रोग पडू लागला असल्याने कापूस बोंडे फुलेलेली असताना पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत होते. हे नुकसान काही तालुक्यांपुरतेच मर्यादित असावे, असे आता आकडेवारीतून दिसू लागले आहे. महसूल यंत्रणेने मराठवाडय़ातील ११ लाख ४२ हजार २४५ हेक्टरावरील कापसाचे नुकसान झाल्याचे म्हटले होते. कापूस पीक वेचणीच्या अवस्थेत असताना ८० ते ९० टक्के नुकसान होईल, असे म्हटले जात होते. प्रत्यक्षात एवढे नुकसान कापूस गाठीचे उत्पादन वाढेल, असे चिन्ह आहेत.

८५ लाख कापूस  गाठी खरेदीचा अंदाज : असे आहेत आकडे

५० लाख हेक्टर पेरणी योग्य क्षेत्रापैकी ४३ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाल्याचे अहवाल आहेत. मात्र, त्यातील कापूस पिकांच्या नुकसानीबाबत प्रश्नचिन्ह  उपस्थित केले जात आहेत. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनीही या अनुषंगाने पाहणी केली आहे. राज्यपालांनी तातडीची मदत देण्याचे आदेशही बजावले. त्यानुसार साधारणत: तीन हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र, या अनुषंगाने केंद्र सरकारकडून मदत देताना कापूस खरेदीचा निकष लावला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही दुष्काळाची मदत देताना कापूस खरेदी एवढी अधिक कशी, असा प्रश्न निर्माण करण्यात आला होता. तो पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे.

विरोधाभास

  • नुकसान मोठय़ा प्रमाणात सोयाबीनचे नुकसान झाले. सुरुवातीला पावसाने ताण होता. त्यात कापूस टिकला. शेवटच्या पावसाने खालच्या बाजूला असणारी बोंडे भिजली. मात्र नंतर कापूस बहरत गेला.
  • पण अडचण वेगळीच आहे. लागवडीखालील क्षेत्र कापसाचे आणि विमा सोयाबीनाचा असे कागदावरचे चित्र असल्याने या विरोधाभासाला सरकार कशा पद्धतीने उत्तर देते.
  • यावर मदत मिळेल की नाही हे ठरू शकेल. पण लागवडीखालील कापसाचे क्षेत्र वाढलेले असल्याने उत्पादकताही वाढली असल्याचे चित्र दिसत आहे.
  • १एक गाठ कापूस म्हणजे १७० क्विंटल कापूस अशा ८५ लाखांहून गाठी अधिक कापूस उत्पादित होईल व त्यांचा दर्जाही चांगला असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • २अनेक तालुक्यातील कापूस भिजल्याने शेतकरी हैराण झाले. कापूस बोडांमध्ये भिजल्याचे चित्र अनेक ठिकाणी होते. मात्र, हे चित्र सार्वत्रिक नसल्याची आकडेवारी आता हाती येऊ लागली आहे.

कापूस खरेदी केंद्रात या वर्षी अधिक दर्जेदार कापूस येत आहे. उत्पादनही वाढलेले आहे. तीन वर्षांच्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर या वर्षी होणारी खरेदी अधिक असेल असा अंदाज आहे. या वर्षी कापूस नोंदणीसाठी एक अ‍ॅपही विकसीत केले आहे. गुगल प्लेस्टोअरवरुन ते वापरणारे २५ हजाराहून अधिक शेतकरी नोंद यामाध्यमातून झाली आहे.n– एस. के. दास, भारतीय   कापूस महामंडळ