कन्नड तालुक्यातील खामगावाची घटना

औरंगाबाद : सोसायटीचे कर्ज, नव्याने घेतलेल्या चारचाकीचे थकीत हप्ते फेडण्याच्या विवंचनेतून एका दाम्प्त्याने शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. कन्नड तालुक्यातील खामगाव येथील ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सायंकाळी गावातच मृत दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेची नोंद देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात झाली आहे. रामेश्वर जगन्नाथ गायके (वय ३५) व अनिता रामेश्वर गायके (३०) अशी मृत दाम्प्त्याची नावे असल्याची माहिती देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे हवालदार आव्हाळे यांनी दिली. प्राप्त माहितीनुसार गायके दाम्पत्याला आठ वर्षांचा एक मुलगा व पाच वर्षांची एक मुलगी आहे. नेहमीप्रमाणे अनिता या शेतात कांदे काढण्यासाठी गेल्या होत्या. तर रामेश्वर गायके यांचे खामगावातच किराणा मालाचे दुकान आहे. सायंकाळी अनिता शेतातून आल्या. तर रामेश्वर दुकान बंद करून घरी आले. रात्री बारावाजेपर्यंत हे कुटुंब दूरदर्शन पाहत जागेच होते. सकाळी लवकर उठून दोघेही त्यांच्या शेतात गेले. तेथे फवारणीसाठीचे रसायन प्राशन केले. तेथेच दोघांचा मृत्यू झाला. दोघेही मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. घटनास्थळावर जाऊन पोलिसांनी पंचनामा केला. प्राप्त माहितीनुसार रामेश्वर गायके यांच्यावर सोसायटीचे कर्ज होते. चारचाकीही घेतली होती पण त्याचे हप्ते थकीत होते. हप्ते फेडण्याच्या विवंचनेतून गायके दाम्त्याने आत्महत्या केली असण्याची शक्यता असून औराळा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.