औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यत आतापर्यंत लागण झालेल्या करोना रुग्णांची संख्या आता २१ हजारांकडे सरकू लागली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४ टक्के असल्याने रुग्ण दुप्पट होण्याचा दर आता ४१.९० वर गेला आहे. येत्या काळात अनावश्यक चाचण्या टाळा असे सांगण्यात आल्याने प्रसाराचा वेग वाढू शकतो असा अंदाज आहे. शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून येणाऱ्या व्यक्तींच्या चाचण्या करावयाच्या की नाही, याचा  निर्णयही सोमवारी होणार आहे. शहराच्या बरोबरीने ग्रामीण भागातील संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रविवारी दुपापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला. घाटी रुग्णालयातील मृत्यूची संख्या आता ४८२ एवढी झाली आहे.

शहरातील भावसिंगपुरा भागातील भीमनगर येथील ६२ वर्षांची महिला, कटकट गेट भागातील बारी कॉलनीमधील ६३ वर्षीय महिला, पडेगाव येथील फुलेनगर येथील ५५ वर्षांचा पुरुष, तर सोयगाव तालुक्यातील खामखेडा येथील ६५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच सांगली येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता २० हजार २८३ एवढी झाली होती. त्यात पुन्हा भर पडली. आतापर्यंत ६३४ जणांचा मृत्यू झाला असून वृद्ध व्यक्तींवर करोनाचा घाला कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. बाधित रुग्णांची संख्या आणि लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षात घेता समूह प्रतिकार शक्ती नर्माण झाली असावी असा अंदाज आहे. मात्र, त्याचा अहवाल सोमवारी कळणार आहे. दरम्यान, औरंगाबादनंतर लातूर जिल्ह्यत करोना अधिक पसरला. त्यानंतर नांदेड, जालना आणि उस्मानाबादमध्येही विषाणूने अधिक पाय पसरल्याचे दिसून आले. हिंगोलीमध्ये संसर्ग पसरण्यापासून वाचविण्यासाठी नाना प्रकारच्या उपाययोजनांची चांगली अंमलबजावणी करण्यात आली.

उस्मानाबादमध्ये आजपर्यंत १२२ जणांचा मृत्यू

जिल्ह्यत मागील दोन महिन्यांत करोनाबाधितांची संख्या तब्बल साडेचार हजारांवर पोहोचली आहे. त्या प्रमाणात करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. वयोवृद्ध व विविध आजार असणाऱ्या १२२ जणांचा आजवर करोनाने बळी घेतला असून सध्या जिल्ह्यतील विविध ठिकाणच्या कोविड  रुग्णालयात दोन हजार रुग्णांवर उपचार सुरू आहे. वाढता संसर्ग लक्षात घेऊन अ‍ॅन्टीजेन किटद्वारे तपासण्या करण्यात येत आहेत.