गोवंश तस्करी करणाऱ्या चार जणांना पैठण तालुक्यातील बिडकिन व औद्योगिक वसाहत पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून दहा चाकी ट्रक, दोन चारचाकी वाहनासह एकूण २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीतील एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

बुधवारी पहाटे चारच्या सुमारास बिडकिन पोलीस उपनिरीक्षक पंडीत सोनवणे हे आपल्या सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करत असताना पैठण औरंगाबाद रस्त्यावरील ढोरकीन गावालगत असणाऱ्या चामड्याच्या कारखान्याजवळ काही तरुण ट्रकमधून गायीचे वासरु खाली उतरवत असताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी गाडी थाबंवताच पाच तरुणांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून चार तरुणांना ताब्यात घेतले, मात्र एक अरोपी फरार झाला. या ट्रकमध्ये गायीची ५० वासरं होते. त्यांना पैठण तालुक्यातील पारुडी येथील गोशाळा येथे पाठवण्यात आले आहे. औरंगाबाद येथील कत्तल खान्यात विक्री करण्यासाठी गोवंशांना मध्यप्रदेश मधून आणल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

सदरची घटना पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाणे हद्दीतील असल्याने बिडकिन पोलिसांनी गोवंश व सर्व मुद्देमाल औद्योगिक वसाहत पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. याप्रकरणी अबीद शकुरखा डोल (मुलतानपुर-मध्यप्रदेश) आझाद मंहमद रफिक (न्याहगर, मध्यप्रदेश), शेख खलील शेख रशीद (औरंगाबाद), फेरोज सलमान शेख, (औरंगाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, सल्लाद्दीन शेख हा फरार झाला आहे. याप्रकरणी पाच जणाविरुध पैठण औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, फोजदार प्रिती सांवत हे करत आहेत. बऱ्याच दिवसांपासून गोरख धंदा सुरू असावा, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.