X

दहीहंडीच्या उत्सवाला क्रेनच्या वाढत्या किमतीचे उधाण!

६० पैकी ३० ते ३५ दहीहंडीच्या कार्यक्रमांना क्रेन लागणार होती.

बिपीन देशपांडे, औरंगाबाद

गोविंदा रे गोपाळा.. हा दहीहंडी फोडताना होणारा ‘डी.जे.’चा गजर.  वेगवेगळ्या मंडळांचे विशिष्ट पेहरावातील कार्यकर्ते आपलाच थर कसा उंच होईल, यासाठी सरसावलेले.. दहीहंडी फोडण्यासाठी एखाद्या चौकातील दोन टोकांच्या इमारतींना जोडलेली दोरी आणि त्यामधोमध अडकवलेली दहीहंडी, असे साधारण चित्र असायचे. मात्र हा उत्सव प्रसिद्धीच्या केंद्रस्थानी नेऊन ठेवतो आहे, हे लक्षात येताच त्यात देखाव्यांच्या साधनांना अनन्य महत्त्व आले आणि दहीहंडीच्या कार्यक्रमांचा सारा बाजच बदलून गेला. क्रेनसारखे यंत्र हे या उत्सवाचे प्रमुख साधन बनले आणि त्याची नवी क्रेझ सुरू झाली. औरंगाबादेत सोमवारच्या गोकुळअष्टमीला दोन ते चार तासांसाठी लागणाऱ्या एका क्रेनचा दर होता ११ हजार ते ३१ हजार रुपये. दहीहंडीची उंची किती, यावर तो दर ठरलेला होता.

पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद शहरात ६० दहीहंडी कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली होती. त्यातील १२ या मोठय़ा म्हणजे उंच, पाच ते सहा थर लावले जातील, एवढय़ा उंचीवरील दहीहंडी आहेत. तर तीन मुख्य दहीहंडी आहेत. शहरातील दहीहंडीसाठी देण्यात येणाऱ्या क्रेनची संख्या ३० पर्यंत आहे. ६० पैकी ३० ते ३५ दहीहंडीच्या कार्यक्रमांना क्रेन लागणार होती. त्यामुळे काही तासांसाठी दर आकारून क्रेन भाडय़ाने देणाऱ्यांनी ती बाहेरून मागवली होती. त्याचे दर ११ हजार ते ३१ हजार रुपयांपर्यंत होते. क्रेनसाठी आयोजकांना त्यांची वेळही बदलावी लागलेली होती. त्यामुळे शहरात सकाळ, दुपार ते सायंकाळ या वेळांत दहीहंडीच्या गोविंदांची धूम सुरू होती. भाडय़ाने क्रेन देणारे अहसान सय्यद अली यांनी सांगितले, की आजच्या दिवसाला मागणी खूप आहे. नवनवीन नियम, यामुळे या उत्सवाला विशिष्ट चौकट मिळत आहे. शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने विशिष्ट वेळांमध्ये आम्ही क्रेन देत आहोत. ६० फुट उंच दहीहंडीला ८० फूट उंच जाणारे क्रेन द्यावे लागते. त्यातही बरेच प्रकार आहेत. अहिरकर क्रेन सव्‍‌र्हिसेसकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन ते तीन तासांसाठी लागणाऱ्या क्रेनसाठी ११ हजार ते २१ हजार रुपयांपर्यंतचा दर आकारला जातो. त्यात दहीहंडी किती उंच आहे, हे पाहिले जाते.  क्रेनच्या भोवती डी.जे. ठरलेले. त्यावरची गाणीही ठरलेली आणि ध्वनिक्षेपकाचा भाडेही. तसे ध्वनिक्षेपकासाठी पन्नास हजार रुपयेही घेतले जातात. पण लोकप्रतिनिधींनी कार्यक्रम आयोजित केल्यामुळे त्यांना बरीच सूट असते. क्रेनवालेही बऱ्याचदा पुढाऱ्यांचेच ठेकेदार असतात. त्यामुळे उचलून रोख पैसे द्यावे लागत नाही. पण ज्यांच्याकडे वशिला नाही आणि दहीहंडय़ा तर लावायच्या आहेत, त्यांना मात्र मोठी वर्गणी गोळा करावी लागते.