महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने २०१७ साली घेण्यात आलेल्या संरक्षण अधिकारी पदाच्या परिक्षेत तोतयेगिरी केल्या प्रकरणी तीन जणांविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिक्षेत तोतयेगिरी करून महिला व बालकल्याण विभागात कनिष्ठ संरक्षण अधिकारी पदावर रूजू झालेल्या एका अधिकाऱ्याचा आरोपीत समावेश असलेल्या सिडको पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी बुधवारी (दि.१७) सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल उत्तम राठोड (रा. किनवट, जि.नांदेड) असे परिक्षेत तोतयेगिरी करून भरती झालेल्या कनिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याचे नाव आहे. तर सुलतान सालेमिया बावन्ना (रा.नांदलगाव, जि.लातूर), प्रबोध मधुकर राठोड (रा.मांडवी, ता.किनवट, जि.नांदेड) अशी इतर आरोपींची नावे आहेत. ७ सप्टेंबर २०१७ रोजी सिडकोतील धर्मविर संभाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे महिला व बालकल्याण विभागासाठी विविध पदासाठी लेखी परिक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी विशाल राठोड याच्या नावावर बनावट हॉलतिकीटच्या सहाय्याने सुलतान सालेमिया बावन्ना याने परिक्षा दिली होती. तर त्यावेळी प्रबोध राठोड याने केंद्रावर मध्यस्थीची भूमिका बजावली होती.

दरम्यान, विशाल राठोड याच्या शैक्षणिक कागदपत्रांची तसेच परिक्षेच्या वेळी दिलेल्या हॉलतिकीट व इतर कागदपत्रांची तपासणी नुकतीच करण्यात आली. त्यामध्ये विशाल राठोड याच्या प्रवेशपत्रावर सुलतान सालेमिया बावन्ना याने आपला फोटो लावून परिक्षा दिली असल्याचे समोर आले. या प्रकरणी महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त मारोती केरबा शिरसाट (वय ५७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक प्रविण पाटील करीत आहेत.