मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या पंजाबमधील अट्टल वाहनचोरट्याच्या पोलिसांनी सोमवारी (दि.१५) मुसक्या आवळल्या. पोलिसांनी अटक केलेला वाहनचोर हा अट्टल गुन्हेगार असून पुणे येथील निगडी पोलिसांच्या हातावर तुरी देवून तो फरार झाला होता. गुरूसेवक सिंग उर्फ पिंदरपाल सिंग (वय ३०, रा.गुरूनानक गल्ली, पिछी सडक, सब्जीमंडी, पटीयाला, पंजाब) असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली, नोयडा येथून आलीशान चारचाकी वाहने चोरून विक्री करणारा गुरूसेवक सिंग उर्फ पिंदरपाल सिंग हा औरंगाबादमध्ये आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आला असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे उपनिरीक्षक विकास खटके, जमादार रमेश सांगळे, मच्छींद्र शेळके, बाळाराम चौरे, प्रविण मुळे, राजेश यदमळ,रवी जाधव, जालींन्दर मांन्टे, दिपक जाधव, शिवाजी गायकवाड, विलास डोईफोडे आदींच्या पथकाने सापळा रचून गुरूसेवक सिंग उर्पâ पिंदरपाल सिंग याला गारखेडा परिसरातून ताब्यात घेतले.

सुरूवातीला पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देणाऱ्या गुरूसेवक सिंग उर्फ पिंदरपाल सिंग याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने त्याच्याविषयीची माहिती पोलिसांना दिली.