प्रतिबंधित भागात फिरणाऱ्यांवर कारवाई ,औरंगाबादची रुग्णसंख्या १ हजार २१८

एका बाजूला शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच मुकुंदवाडी भागातील संजयनगर व रामनगर भागात बरे झालेले करोना रुग्ण पुन्हा फिरत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील वावर रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची पायी गस्त पथके काम करत असून प्रत्येक चमूकडे आता ध्वनिवर्धकही  देण्यात आले आहेत. दरम्यान शुक्रवारी सकाळच्या सत्रात २६ रुग्णसंख्या वाढल्याने आतापर्यंत करोनाबाधित झालेल्या व्यक्तींची संख्या एक हजार २१८ एवढी झाली आहे.

एका बाजूला सर्व प्रशासकीय यंत्रणा करोनाचा प्रसार रोखला जावा म्हणून प्रयत्न करत असतानाही लोकांकडून मात्र त्यांना सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे. बऱ्याच प्रमाणात या भागातील टाळेबंदी कडक करण्यात आली आहे. मात्र, अजूनही लोक घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्यत्र सकाळी ७ ते दुपारी एक वाजेपर्यंतचे व्यवहार काहीसे सुरळीत होत आहेत. मात्र, सकाळच्या सत्रात महिलांचे जथ्थे कामाच्या शोधात बाहेर पडताना दिसतात. पण शहरात अशा व्यक्तींना काम मिळण्याची कोणतीही योजना नाही. त्यामुळे आता घरकाम करणाऱ्या महिलांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान जयभवानीनगर मध्ये पाच, न्यायनगर भागात चार, गरम पाणी, रेहमानिया कॉलनी, राजाबाजारमधील कवरपल्ली, सुराणानगर, मिलकॉर्नर, भवानीनगर, जसवंतपुरा भागातील रहीमनगर, सातारा परिसर, जवाहर कॉलनी, टाईम्स कॉलनी,एन-२ या भाागात रुग्ण आढळून आले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यच्या ग्रामीण भागातही आता विषाणू पाय पसरू लागला आहे. गंगापूर तालुक्यातील फूलशिवरा, कन्नड तालुक्यातील धनगरवाडी,, पिसादेवी या भागात करोना रुग्ण आढळून आले आहेत. खुलताबाद येथेही रुग्ण आढळले होते. मात्र, अनेक भागातून प्रशासनाला सहकार्य होत असल्याने हे आकडे वाढण्याची शक्यता नाही. मात्र, शहरी व्यक्ती गावातील नातेवाइकांकडे मुक्कामी थांबत आहेत. परिणामी ग्रामीण भागातही करोना विषाणू पोहोचत आहे. औरंगाबाद शहरातून अर्जित रजा घेतलेल्या एका महिला पोलिसामुळे फूलशिवरा भागात करोना पोहोचला. त्याच्या नातेवाइकांना कन्नड तालुक्यात लागण झाली. त्यामुळे आता ग्रामीण भागातही काही गावात टाळेबंदी करावी लागत आहे. मात्र, या मोजक्या गावांव्यतिरिक्त दळणवळणासह दुकाने सुरू ठेवली जाणार आहेत. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात गुन्हे दाखल करेपर्यंत प्रशासनाला करवाई करावी लागत आहे.

कारागृहात विषाणूचा शिरकाव नाही

औरंगाबाद शहरातील हर्सूल कारागृहात रुग्ण आढळून आल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र, कारागृह प्रशासनाने ही बाब नाकारली होती. कारागृहाचे सील उघडण्यात आलेले नाही. सर्वानी स्वत:ला आत कोंडून घेतले आहे. कोणीही बाहेर निघालेला नाही. त्यामुळे प्रसार होण्याची शक्यताच नाही, असे कारागृह प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत होते. अहवालातील व्यक्ती कारागृह भोवतालच्या परिसरातील आहे. हर्सूल जेल असा उल्लेख त्या परिसराचा होता. कारागृहात विषाणूचा शिरकाव नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

आणखी दोघांचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील गंभीर रुग्णांची संख्या १३ असून बहादुरपुरा भागातील ७० वर्षांच्या महिलेचा शुक्रवारी पहाटे ३.३० मृत्यू झाला. तसेच संजयनगरमधील ४१ वर्षांच्या महिलेचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. या दोन्ही करोनाबाधित महिलांना मधुमेह होता, असे घाटी रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. औरंगाबादमधील करोनाबाधित मृत व्यक्तींची संख्या ४४ झाली आहे.

आणखी एका पोलीस महिलेला करोना

पोलीस विभागातील आणखी एका पोलीस महिला कर्मचाऱ्याचा करोना अहवाल सकारात्मक आला आहे. संबंधित महिला पोलीस ही क्रांती चौक पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्या महात्मा फुले चौकात बंदोबस्तावर होत्या, अशी माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी बाधित निघालेली महिला पोलीस कर्मचारी पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील निवासस्थानातील रहिवासी आहेत. यापूर्वी दोन महिलाही करोना बाधित झाल्या असून पोलीस विभागातील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या १० वर पोहोचली आहे. दरम्यान सायबर विभागाच्या २२ कर्मचाऱ्यांचा करोनाचा अहवाल नकारात्मक आला आहे.