वाळूज येथील ५ अतिक्रमित धार्मिक स्थळांवर कारवाईदरम्यान तहसीलदार रमेश मुनलोड यांना शिवीगाळ करणारे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर सोमवारी अखेर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गुन्हा दाखल होऊ नये, असे प्रयत्न भाजपमधून काही नेत्यांनी केले होते. त्यामुळे ४ दिवसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह अन्य ३०-४०जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल कलम ३५३अन्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली. खैरे यांनी तहसीलदार मुनलोड यांच्याविरोधात शिवराळ भाषा वापरली होती. त्यांच्याविरोधात महसूल विभागाने लेखणी बंद आंदोलन केले होते. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत महसूल संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात होती. खैरेही आक्रमकपणे तहसीलदार कसे चुकीचे आहेत, हे सांगत होते. पत्रकार बैठक घेऊन त्यांनी तहसीलदार मुनलोड यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप केले होते. पाच धार्मिक स्थळे पाडल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करीत जिल्हाधिकाऱ्यांवरही टीका केली जात होती.
गुन्हा दाखल करू नये, या साठी भाजप नेत्यांनी दबाव आणल्याच्या आरोपाचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खंडन केले. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून तक्रार येण्याची आम्ही वाट पाहत होतो. दोन्ही तक्रारी एकत्र करून गुन्हा नोंदविणे शक्य असल्याने चार दिवस गेल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते.