अंबाजोगाईतील पोलीस नाईक संतोष हरिश्चंद्र चाटे यांच्या आत्महत्येप्रकरणी मृताच्या पत्नीने दिलेली तक्रार आणि लिहून ठेवलेली ‘सुसाईड नोट’ यावरून अखेर तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी व दोन पत्रकारांसह एकूण सात जणांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीनंतर नातेवाईकांनी गुरुवारी सकाळी चाटे यांचा मृतदेह ताब्यात घेतला. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली आणि दोन पत्रकारांनी बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याच्या मनस्तापातून चाटे यांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण घडल्याने खळबळ उडाली.
अंबाजोगाई शहर ठाण्यातील पोलीस नाईक संतोष चाटे यांनी बुधवारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी चाटे यांनी दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा सविस्तर तपशील चिठ्ठीत लिहून ठेवला असल्याने नातेवाईकांनी संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी अंबाजोगाईत जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
मृताची पत्नी स्वाती संतोष चाटे (दादाहरी वडगाव, तालुका परळी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक नीलेश मोरे, निरीक्षक एस. बी. पौळ, सहायक निरीक्षक बी. डी. बोरसे, दोन पत्रकार योगेश गुजर व त्यांचा डॉक्टर भाऊ अशा सात जणांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. गुरुवारी सकाळी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन दुपारी दादाहरी वडगाव या मूळगावी चाटे यांच्यावर अंत्यसंस्कार केले. चाटे यांच्या पश्चात पत्नी, सहा वर्षांची मुलगी व पाच महिन्यांचा मुलगा आहे.
गेल्या रविवारी रात्री मोंढा भागात गस्तीवर असताना पोलिसांना बघून योगेश गुजर पळत असल्याने पोलीस नाईक चाटे यांनी त्याला पकडले. या वेळी दोघांमध्ये हाणामारी झाली. यात चाटे यांचा अंगावरील पोलिसाचा गणवेश फाटला. रात्रीच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन योगेश गुजरविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार दिली.
दरम्यान, गुजर हा शहरातील व्यापारी आणि वैद्यकीय व्यावसायिकाचा भाऊ असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ नये, या साठी दबाव वाढला, तर औषध दुकानदारांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस उपअधीक्षकांची भेट घेऊन योगेश गुजर हे दुकानदार असून त्यांनाच विनाकारण मारहाण करून चाटे यांनी स्वतच अंगावरील कपडे फाडून खोटी तक्रार दिल्याचा आरोप केला. दोन वर्तमानपत्रांतूनही (लोकसत्ता नव्हे!) उलटसुलट वृत्त प्रकाशित झाले. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी पोलीस नाईक चाटे यांना बोलावून फैलावर घेतले.
प्रामाणिकपणे काम करीत असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्यालाच अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे चाटे यांनी चिठ्ठीत नमूद केले. गुन्हा दाखल झालेले सर्व आरोपी फरारी झाले असून गुरुवारी सायंकाळपर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.