शहरातील करोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ाहून अधिक आहे. शुक्रवारी सकाळी औरंगाबादमधील विविध वसाहतींमध्ये रुग्ण नव्याने ४६ वाढले. आजारातून बरे झालेल्या व्यक्तींची संख्या आता १ हजार ४५३  एवढी झाली असून आत्तापर्यंत ९०१ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. दरम्यान टाळेबंदीमध्ये शिथिलता मिळावी यासाठी व्यापारी महासंघाकडूनही प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनही एक जूनपासून थोडीशी शिथिलता देण्यास सकारात्मक असल्याचे वरिष्ठ  सूत्रांनी सांगितले.

मराठवाडय़ातील करोनाबाधितांची संख्या लक्षात घेता ग्रामीण भागात कोणकोणत्या उपाययोजना केल्या जाव्यात आणि कोणत्या पद्धतीने विषाणू पाय पसरणार नाही याबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी आणि आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठांची बैठक घेतली. यामध्ये औरंगाबाद  शहरात कशा पद्धतीच्या उपाययोजना करण्यात आल्या. या विषाणूचे भय वाढणार नाही पण काळजी कशी घ्यावी लागेल, याबाबत चर्चा करण्यात आली. इतर शहरात अंमलबजावणी करताना कोणत्या चुका टाळाव्यात, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान शहरातील रुग्ण संख्येत तीन दिवसापासून दिसून येणारी घट आज पुन्हा काहीशी वाढली. ४६ रुग्णांपैकी दौलताबाद, कन्नड येथील रामनगरमध्ये दोन रुग्ण सापडले आहेत.

ग्रामीण भागातील वाढ अत्यंत मंद गतीने असल्याने ग्रामीण भागात टाळेबंदीमध्ये मोठी शिथिलता असेल, असे सांगण्यात आले. तसेच शहरातील विविध भागात रुग्ण संख्या वाढत आहे.

इटखेडा, उस्मानपुरा, एन टू मधील विश्रांतीनगर या भागात प्रत्येकी तीन रुग्ण आढळून आले. त्याच बरोबर  सिडको एन ६, भूषणनगर,  कैलाशनगर, श्रीनिकेतन कॉलनी, उस्मानपुरा, खडकेश्वर, सातारा परिसरातील खंडोबा मंदिर, नारळीबाग, रोशन गेट, राशिदपुरा, मोतीवालानगर या भागात रुग्ण आढळून आले आहेत.

दररोज नव्या वस्तीमध्ये एखादा रुग्ण निघतो आहे. असे असले तरी परिस्थिती घाबरण्यासारखी नाही. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. दाट लोकवस्तीमध्ये पाय पसरणारा विषाणू आता आटोक्यात येत आहे. आता ४८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना आजाराची लागण होत आहे. मात्र,अजूनही लोक जबाबदारीने वागत नसल्याचे दिसून येत आहे. मुखपट्टी न लावता फिरणाऱ्या तरुणांवर आज पुन्हा पोलिसांनी कारवाई केली.

दुकाने उघडण्यास परवानगी?

नव्या टाळेबंदीत दुकाने उघडण्यासाठी अधिकचा वेळ  दिला जाईल. तसेच आवश्यक वस्तूंशिवाय इतरही दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळू शकते, असे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ग्रामीण भागातील दुकाने उघडण्यास शिथिलता असेल असे  जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.

आणखी एका पोलिसाला करोना

सिटी चौक पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस कर्मचाऱ्याचा करोना चाचणीचा अहवाल शुक्रवारी सकारात्मक आला. रशीदपुरा-गणेश कॉलनीतील रहिवासी असलेले संबंधित कर्मचारी मागील आठ-दहा दिवसांपासून ईदच्या सुटीवर होते. तीन दिवसांपूर्वी ते रुजू झाले. मात्र गुरुवारी त्यांनीच आपल्याला ताप व करोनाशी संबंधित लक्षणे जाणवत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांची तातडीने तपासणी करण्यात आली. मात्र, ते ठाण्यातील कोणाच्याही संपर्कात आलेले नाहीत, अशी माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. यापूर्वी औरंगाबाद पोलीस विभागातील १२ जण करोनाने बाधित झालेले असून त्यात दोन महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.