बिपीन देशपांडे

चारा, पेंड, सुग्रासचे वाढलेले दर आणि टँकरने विकतचे पाणी घेऊन जगवणाऱ्या पशुधनाच्या माध्यमातून करण्यात येणारा दुग्धव्यवसाय सध्या उत्पादकांच्या तोंडाला फेस आणणारा ठरू लागला आहे. त्यामुळे दुधाचा व्यवसाय सध्या आतबट्टय़ाच्या प्रकारात मोडत आहे. शेतकऱ्यांकडून नफा-तोटय़ाचा हिशोबच मांडला जात आहे.

औरंगाबादजवळच्या आडगावात ८० टक्के शेतकरी दूध उत्पादक आहेत. या एका गावातील गायींची संख्या एक हजारांच्या जवळपास आहे. म्हशी व इतर जनावरे मिळून दीड हजारांच्या जवळपास संख्या असल्याची माहिती आडगावचे उत्पादक परमेश्वर साळुंके यांनी दिली. साळुंके यांच्याकडे सात जनावरे आहेत. त्यांच्या गावातील काही ३०-४० जनावरे असणारेही आहेत. या सर्वाचे उत्पन्नाचे साधन शेतीसह दुग्ध व्यवसाय. दुष्काळाच्या काळात शेतीतून तर काही हाती आले नाही. दुग्ध व्यवसायाचा आधार वाटत होता. पण त्यातूनही येणारा नफा सध्या आटला आहे. या व्यवसायाचा सध्याचा नफा आणि तोटा, याचा हिशोबच परमेश्वर साळुंके यांनी मांडला.

पेंडेचा दर दीड-एक महिन्यांपासून वाढलेला आहे. सध्या पेंडेचा दर तीन हजार शंभर रुपये क्विं टल आहे. सहा महिन्यांपूर्वीपर्यंत याच पेंडेचा दर सतराशे ते अठराशे रुपयांपर्यंत होता. दहा दिवसाला सात जनावरांसाठी एक पेंड लागते.

कडबा तर वापरणे शक्य नाही. कारण गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे ज्वारीचे उत्पादनच झाले नाही. ज्वारीचा कडबा सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे उसाचे वाढे (चारा) जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरले जाते. त्याचा दर आज तब्बल ४२०० रुपये टन आहे. गावात आणण्यापर्यंतचा खर्च मिळून पाच हजार रुपये खिशातून जातात. सुग्रासची एक पिशवी १४५० रुपयांना औरंगाबादच्या बाजारातून खरेदी करावे लागते. याशिवाय दुष्काळामुळे जनावरांसाठी पाण्याचे टँकर मागवावे लागतात. एक हजार लिटरचा टँकर दहा दिवसांतून दोन वेळा मागवावा लागतो. ५०० रुपये टँकरप्रमाणे दहा दिवसाला एक हजार रुपये पाण्यावर खर्च होतात. पेंड, सुग्रास, पाणी आणि चारा यावर मिळून साधारण दहा हजार रुपये खर्च होतो. शासकीय दूध डेअरीवर दूध जाते. तेथे सध्या २५ रुपये लिटरचा भाव मिळतो. दिवसाकाठी ४० लिटर दूध, याप्रमाणे दहा दिवसात ४०० रुपये लिटरच्या दुधापोटी २५ रुपये शासकीय दराप्रमाणे १० हजार रुपयेच मिळतात. यात नफा तर नाहीच. पण अंगमेहनतीचा परतावाही मिळत नाही. दूध नेण्याचा वाहतूक खर्च लक्षात घेता या व्यवसायातील नफा सध्या तरी आटला असल्याचे परमेश्वर साळुंके यांनी सांगितले. काकासाहेब शिंदे पाटील यांनीही दूध व्यवसाय ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू असल्याचे सांगितले. शिंदे यांच्याकडे ५० जनावरे आहेत. पशुधनावर सध्याच्या ढेप, चारा दरवाढीवर होणारा खर्च पाहता दुग्ध व्यवसायातून नफा काहीच हाती लागत नाही, असे शिंदे पाटील यांनी सांगितले.