विशेष मुलाखत : इम्तियाज जलिल, आमदार, एमआयएम

विधानसभा, औरंगाबाद आणि नांदेड महानगरपालिका तसेच अन्य छोटय़ामोठय़ा निवडणुकांमध्ये प्रभाव पाडणाऱ्या मजलिस-ए-इत्तिहादुल मुसलमीन (एमआयएम) पक्षाने आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. विशेषत: मराठवाडय़ातील मुस्लीमबहुल शहरांवर पक्षाची भिस्त आहे. मुस्लीम आणि दलित असे समीकरण साधण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील पक्षाचे नेते आणि आमदार इम्तियाज जलिल यांनी ‘लोकसत्ता’शी साधलेला संवाद.

नांदेडनंतर औरंगाबादवर लक्ष्य केंद्रित केले होते. आता कोणत्या जिल्हय़ात लक्ष केंद्रित करणार आहात?

मराठवाडय़ात जवळपास सर्व ठिकाणी उमेदवार उभे करण्याचे नियोजन आहे. मात्र काही ठिकाणी अधिक लक्ष घालणार आहोत. उदगीर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, जालना जिल्हय़ातील अंबड, मलकापूर येथील निवडणुकांवर विशेष लक्ष आहे. मंगळवारी परभणी येथे सकाळी आणि त्याच दिवशी रात्री जालना येथे असदोद्दिन ओवेसी यांच्या सभा होणार आहेत. या कालावधीत १५ सभा असदद्दिन यांच्या तर ८ सभा अकबरोद्दिन यांच्या घेण्याचे नियोजन आहे. ओवेसी बंधूंच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

चांगला प्रतिसाद म्हणजे कसा?

जालना जिल्हय़ातील एका जैन समाजातील व्यक्तीने भाजपकडून तिकीट मागितले होते. त्यांना ते मिळाले नाही. तेथून निवडणूक लढवायची असल्याने अनिता अजित कोठारी नावाच्या महिलेने एमआयएमकडून उमेदवारी मागितली. याचा अर्थ केवळ मुस्लीमच नाही तर अन्य अल्पसंख्याक समाजही आता पक्षात येण्यास उत्सुक आहे. मराठवाडय़ात काही शहरांतील निष्पाप तरुणांना पोलिसांनी अटक केली किंवा त्यांचा छळ केला. त्याचीही प्रतिक्रिया उमटत आहे.

एमआयएम निवडणुकीत उतरली की, शिवसेनाभाजपला लाभ होतो. या निवडणुकीत तुम्ही धर्माच्या नावावर मते मागितली तर तसाच प्रचार होईल?

जात, धर्म हे वास्तव आहे. त्याला टाळून कोणत्या निवडणुका झाल्या आहेत? एमआयएम नव्हती तेव्हा जात-धर्म विचारात घेऊन मतदान होत नव्हते काय? कोणाला लाभ होतो आहे हे पाहण्यापेक्षा आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे. किती वष्रे एकाच घरात सत्ता ठेवायची, याला काही मर्यादा हव्यात की नको? बीडमध्ये क्षीरसागर घराणे किती दिवस राज्य करणार? यामुळेच मुस्लीम वस्त्यांची स्थिती कधी बदलली जात नाही. कोणत्या गावात मुस्लिमांची स्वच्छ वस्ती आहे? मत घेतल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची नेते मंडळी मुस्लीम वस्त्यांमध्ये कधी येतसुद्धा नाहीत. एका शहरात दोन शहरे असतात. एक चांगले एक अस्वच्छ.

दलितमुस्लीम एकीकरणाचे सूत्र कितपत रुजते आहे?

बहुतांश जिल्ह्य़ात उमेदवारी देताना आम्ही या सूत्राचा विचार करतो आहेत. ‘जय भीम-जय मीम’ हा नारा आहे. तो रुजताना दिसतो आहे. बऱ्याच ठिकाणी दलित पक्षांशी स्थानिक पातळीवर युतीची बोलणीही सुरू आहे. किमान एकमेकांना मदत करण्याची तरी भूमिका घ्यावी, असे बोलणे सुरू केले आहे.

एमआयएमच्या नावावर नगरपालिका निवडणुकीत काही जण देवाणघेवाण करत असल्याचे कानावर आहे, हे खरे आहे काय?

होय, हे खरे आहे. आमच्याही कानावर काही बाबी आल्या आहेत. विशेषत: नांदेड जिल्ह्य़ात काही घटना घडल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्य़ातील चिखली येथील एक ध्वनीफीतही फिरत आहे. पण पक्षाच्या नावाखाली अशी दुकानदारी खपवून घेतली जाणार नाही. काही नेत्यांना जाणीवपूर्वक अटक केली जावी, असेही प्रयत्न नांदेड जिल्ह्य़ात सुरू आहेत. मात्र अशा प्रकारच्या कारवाईला सामोरे जाण्याची पक्षाची तयारी आहे.

नगरपालिकांच्या या निवडणुकांमधून एमआयएमला काय हाती लागेल?

२०१९च्या निवडणुकांपूर्वी आपली ताकद कोठे आहे, याचा अंदाज समजू शकेल. आता ग्रामीण भागात तशी मुस्लिमांची संख्या नगण्य आहे. बहुतांश मुस्लीम समाज हा नगरपालिका हद्दीत आहे. या निवडणुकीच्या निकालावरून ताकद कळण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच काही मराठा समाजाच्या व्यक्तींनीही उमेदवारीची मागणी केली आहे. ७ व ८ नोव्हेंबर रोजी असदोद्दिन ओवेसी मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करून कोठे, किती ताकद लावायची याची रणनीती ठरेल.