मराठवाडय़ातील बहुतांश भागात मागील आठवडाभरापासून सतत पडणाऱ्या पावसाचा जोर कायम असून शेतात पाणी साचून राहिल्याने बहुतांश भागातील मूग, कापसाचे पीक धोक्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी शेतातच मुगाला कोंब फुटल्याचे चित्र आहे. मराठवाडय़ात यंदा दीड लाख हेक्टरच्या आसपास मुगाची पेरणी झालेली आहे, तर कापसाची १४ लाख हेक्टरवर पेरणी झालेली आहे. यातील अनेक भागातील पिकांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्य़ात जून ते २० ऑगस्टपर्यंत १ हजार ५८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्य़ाची सरासरी केव्हाच ओलांडली आहे. मागील आठवडय़ात पावसाची संततधार होती. मंगळवारचा दिवस वगळता सतत पाऊस सुरूच आहे. बुधवारीही सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधून-मधून पावसाने हजेरी लावणे सुरूच ठेवले होते. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून पिके पिवळी पडू लागली आहेत. मुगाचे पीक तर हातचे गेले, असे शेतकरी अशोकराव लोखंडे यांनी सांगितले.

मुगाला शेतातच कोंब फुटले असून गौरी-गणपतीच्या तोंडावर मुगाची बाजारात विक्री करून सण साजरा करण्याच्या शेतकऱ्यांच्या आशेवर पावसाने पाणी फेरल्याचे गणेश हाके यांनी सांगितले.

मराठवाडय़ात यंदा मुगाची १ लाख ४६ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील बहुतांश भागातील पीक हातून गेले आहे. मुगाच्या शेंगा काळ्या पडल्या आहेत. मूग खरेदीही अजून सुरू झालेली नाही. काहींनी मूग पावसाचा जोर वाढण्यापूर्वीच घरात आणून ठेवला आहे. मात्र, विक्रीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, असे शेतकरी सांगत आहेत.