माणूस तासाभरात २३ वेळा चेहऱ्यावरुन हात फिरवत असल्याचे निरीक्षण

औरंगाबाद : माणूस तासाभरात किती वेळा चेहऱ्यावरून, नाकावरून हात फिरवू शकत असेल.? अभ्यासकांनी केलेल्या निरीक्षणात त्याचे उत्तर ‘‘सरासरी २३ वेळा’’ असे नोंदले गेले आहे. करोना विषाणूचा फैलाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या निरीक्षणाला अधिक महत्त्व येत असून हात चेहरा, नाकावरून फिरवण्याची सवय घातक ठरणारी असल्याचे सांगण्याच्या उद्देशानेच हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे, असे औरंगाबाद येथील मुख रोग, दंत रोग चिकित्सकांकडून सांगण्यात आले आहे.

विशेषत विद्यार्थ्यांच्या एका व्याख्यानादरम्यान नोंदवलेल्या या हालचाली असून त्यातूनच विषाणू शरीरात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नसून माणसाची त्याची स्वतचीच ही सवय त्याच्यासाठी घातक ठरणारी आहे. यासंदर्भात अमेरिकेतील नामांकित वर्तमानपत्र न्यूयॉर्क टाइम्समध्ये अलीकडेच काही मान्यवर संशोधक, अभ्यासकांचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याचा हवाला देत औरंगाबाद येथील ज्येष्ठ मुखरोग तज्ज्ञ डॉ. सीमित शहा यांनी सांगितले, की करोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला वारंवार हात धुणे, सॅनिटायझर्स लावणे, अशी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. बहुतांश माणसे त्याचे पालनही करत आहेत. मात्र, त्याचे हात एखाद्या विषाणूच्या ठिकाणीही लागलेले असतात. हाच हात नकळतपणे माणसाकडून त्याच्या चेहऱ्यावरून फिरवला जातो. डोळ्यांजवळ जातो. त्याच हाताने नाक खाजवले जाते. तासाभरात चेहऱ्यावर हात गेला नाही, असे सहसा घडत नाही. यातूनच काही तज्ज्ञांनी, संशोधकांनी चेहऱ्याला स्पर्श करण्याच्या सवयीचा अभ्यास केला आहे. त्यात प्रत्येक जण चेहऱ्याला स्पर्श करतच असतो आणि त्याला त्याची सवय झाली आहे, हे पाहणीत पुढे आले. एक अभ्यासक डॉ. मॅक्लॉज यांच्या मते एखाद्या संसर्गजन्य गोष्टीला स्पर्श केल्यास आपण दर तासाला विषाणूला ११ वेळा संधी देतो. करोनाला दूर ठेवण्यासाठी दात आणि हात स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. शिवाय वातानुकूलित वाहन, मॉलमधील वावरही हानिकारक आहे.

डॉ. सचिन राऊत यांनी सांगितले,की हाताने चेहऱ्याला स्पर्श करण्याच्या सवयी तोडण्यासाठी अभ्यासकांनी काही उपाय सुचवले आहेत. डोळ्यांना थेट स्पर्श टाळण्यासाठी चष्म्याचा वापर करावा. तसेच फेसशिल्ड वापरावी, ज्यामुळे हात सहजपणे चेहऱ्यापर्यंत पोहोचणार नाही. करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नाक, तोंड, डोळे यांपासून शक्य तेवढे हात दूर ठेवणे गरजेचे.