|| सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : विदेशी पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असली तरी आलिशान समजल्या जाणाऱ्या ‘डेक्कन ओडिसी’ या विशेष रेल्वेगाडीच्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, अजूनही ३३ टक्के तिकिटे विकली जात नसल्याचे स्पष्ट  झाले आहे.

गेल्या वर्षी या रेल्वेची प्रवासी वाहतूक टक्केवारी ७७ टक्क्य़ांपर्यंत गेली होती. ही गेल्या १५ वर्षांतील सर्वाधिक टक्केवारी असून १४७८ प्रवासी या रेल्वेने पर्यटनस्थळापर्यंत पोहोचले होते. या वर्षी फेब्रुवारी महिनाअखेपर्यंत २३ वेळा डेक्कन ओडिसीचा प्रवास झाला आणि त्यातून १०७७ प्रवाशांनी प्रवास केला. डेक्कन ओडिसीच्या एका तिकिटाचे डिलक्स सूटचे दर ६७३४ अमेरिकन डॉलर, तर प्रेसिडेन्शियल सूटसाठी १४५८४ डॉलर एवढी आहे. तर भारतीय पर्यटकांसाठी ४ लाख ७१ हजार तर मुलांसह  ६ लाख ७६ हजार २०० रुपये एवढे दर आहे. या रेल्वेचे व्यवस्थापन ज्या कंपनीमार्फत केले जात होते, त्या ‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग’च्या आर्थिक घडामोडींकडे महाराष्ट्र सरकारच्या वरिष्ठांचे बारकाईने लक्ष असून त्याबाबत नवीन निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

२००४ ते २०१९-२० या १५ वर्षांच्या कालावधीमधील डेक्कन ओडिशीमधील प्रवासी वाहतुकीचे प्रमाण किती होते याबाबतची विचारणा महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे केल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या १५ वर्षांत या रेल्वेत बसून पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत १५ टक्क्य़ांवरून ७७ टक्क्य़ांपर्यंतची वाढ दिसून येत आहे.

२००४-०५ मध्ये ४०६ प्रवाशांनी या रेल्वेमधून प्रवास केला होता. त्यानंतर २००७-०८ मध्ये ही संख्या हजारी पार गेली. तेव्हा १०६७ प्रवाशांनी प्रवास केला होता. तेव्हा टक्केवारी होती ४४ टक्के. २०१८-१९ मध्ये सर्वाधिक प्रवासी या रेल्वेत बसले. त्याची संख्या १४७८ होती आणि प्रमाण ७७ टक्के होते. गेल्या वर्षभरात म्हणजे २०१९-२० मध्ये फेब्रुवारी अखेपर्यंत २३ फेऱ्या विविध पर्यटन क्षेत्राला करण्यात आल्या. त्यामुळे ज्या कंपनीला हे काम दिले होते, त्यांच्याकडून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला मिळणारी रक्कम प्रलंबित नाही, असेही सांगण्यात येत आहे. २०१९-२० मध्ये करारानुसार ३ कोटी ७५ लाख रुपयांचा महसूल पर्यटन मंडळाला मिळाला असून ही रेल्वे सुरू झाल्यापासून पहिल्या तीन वर्षांत दोन टक्के, एक वर्ष अडीच टक्के आणि सहाव्या वर्षांपासून ते आतापर्यंत पाच टक्क्य़ांची वाढ केली गेली असल्याचे सांगण्यात येत आहे. विविध पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या डेक्कन ओडिसीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कॉक्स अ‍ॅण्ड किंग्स या कंपनीकडे आहे. त्यांच्याकडून ठरावीक स्वरुपातला महसूल महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळास मिळत असतो. जागतिक दर्जाच्या विविध पर्यटनस्थळी मुक्कामी थांबणाऱ्या या रेल्वेमधील प्रवासी वाढत असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने केला आहे.

डेक्कन ओडिसीमुळे पर्यटनाला एक वेगळी चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याला गेल्या वर्षांत चांगला प्रतिसाद मिळाला, असे दिसून आले आहे. रेल्वेची पूर्ण क्षमता वापरली जात नसली तरी गेल्या काही वर्षांत त्यात सकारात्मक बदल दिसून येत आहेत.

– अभिमन्यू काळे व्यवस्थापक-महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ